टिटवाळा : मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गामध्ये कल्याण तालुक्यातील शेकडो एकर जमीन बाधीत होत आहे. या संदर्भात तालुक्यातील १० गावांतील शेकडो शेतकरी या विरोधात संघर्ष समितीच्या माध्यमातून गुरुवारी कल्याण येथील उपविभागीय कार्यालयावर मोर्चा काढणार आहेत.समृद्धी महामार्गात कल्याण तालुक्यातील उशीद, फळेगाव, रुंदे उतणे, गुरवली, निंबवली, राया, दानबाव, चिंचवली येथील शेतकऱ्यांची शेकडो एकत्र जमीन या महामार्गात बाधित होत आहे. या महामार्गाला विरल गावातून सुरुवातीपासूनच विरोध होत आहे. या बाबत वारंवार सभाही झाल्या आहेत. शेतकऱ्यांचा विरोध असतानाही सरकारकडून सीमांकन, मोजणी सुरू आहे. या प्रकल्पासाठी आम्हाला आमच्या जमिनी द्यायच्या नाहीत, तर प्रशासन का जबरदस्ती करत आहे, असा सवाल शेतकरी करत आहेत. तालुक्यातील शेकडो शेतकरी गुरुवारी सकाळी शहाड येथे कल्याण प्रांत कार्यालयावर धडक देणार आहेत. संघर्ष समिती ठाणे जिल्हा व कल्याण तालुक्यातर्फे हा मोर्चा काढण्यात येणार आहे. दरम्यान, मोर्चात कुणबी सेनाप्रमुख विश्वनाथ पाटीलही सहभागी होणार आहेत. (वार्ताहर)
समृद्धी महामार्गाविरोधात कल्याणला उद्या मोर्चा
By admin | Updated: March 15, 2017 02:22 IST