ठाणे : वर्षभरात केलेले व अर्धवट राहिलेल्या विविध विकासकामांचा जिल्हानिहाय आढावा घेण्याची पद्धत भाजपा सरकाने नुकतीच सुरू केली आहे. आर्थिक वर्ष संपताच राज्यातील जिल्हा परिषदांच्या विकासकामांचा आढावा मंत्री, राज्यमंत्र्यांद्वारे घेतला जात आहे. यानुसार, ठाणे जिल्हा परिषदेच्या विकासकामांची झाडाझडती २४ एप्रिल रोजी ग्रामविकास राज्यमंत्री दादाजी भुसे घेणार आहेत. यासाठी खातेप्रमुखांच्या रंगीत तालमीला प्रारंभ झाला आहे.जिल्हा परिषदेच्या विकासकामांचा आढावा सुरू होण्याआधी बांधकाम राज्यमंत्री व पालकमंत्री एकनाथ शिंदेदेखील करोडो रुपये खर्चाच्या जलयुक्त शिवार अभियानाच्या कामाचा आढावा घेऊन सनियंत्रण समितीला धारेवर धरणार आहेत. कृषी विभागासह ग्रामीण पाणीपुरवठा, लघुपाटबंधारे विभागाने या जलयुक्त शिवार अभियानाची जी कामे जिल्ह्यात केली आहेत, यातील पूर्ण, अपूर्ण कामांसह भ्रष्टाचार झाल्याच्या तक्रारीस अनुसरून चर्चा होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.मार्च संपताच अर्थसंकल्पात निश्चित केलेल्या कामांकडे लक्ष केंद्रित करणाऱ्या प्रशासनाने वर्षभरात काय केले. दरम्यान, आलेल्या तक्रारींवर काय कार्यवाही झाली. याशिवाय, वर्षभर करण्यात येणाऱ्या विकासकामांचा ऊहापोह या बैठकीत होण्याची अपेक्षा जाणकारांकडून व्यक्त केली जात आहे. यानुसार, या भुसे जिल्हा परिषदेच्या कामाचा आढावा घेण्याची अपेक्षा आहे. पाच वर्षांपेक्षा अधिक कालखंडापासून जिल्हा परिषदेवर राजकीय बॉडी नाही. जिल्ह्यातील धुरंधर राजकारण्यांनी बिनविरोध निवडून आलेल्या सदस्यांविरोधात न्यायालयात धाव घेऊन तत्कालीन निवडणुकीला स्थगिती मिळवलेली आहे. यामुळे अधिकारी राज असलेल्या या जिल्हा परिषदेच्या कामकाज व विकासकामांचा आढावा जिल्ह्यातील सर्व खासदार, आमदार यांच्या उपस्थितीत घेतला जाणार आहे. यासाठी सर्व अधिकाऱ्यांची धावपळ सुरू झाली असून आता यात दोषी आढळणाऱ्या अधिकाऱ्यांवर काय कारवाई होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. वर्षभराच्या विकास कामांचे नियोजनही या वेळी होण्याची शक्यता आहे. (प्रतिनिधी)
ठाणे जि.प.च्या विकासकामांची मंत्र्यांद्वारे आज झाडाझडती
By admin | Updated: April 24, 2017 02:22 IST