लॉकडाऊनमुळे टीएमटीचे चाक पंक्चर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2021 04:36 AM2021-05-22T04:36:28+5:302021-05-22T04:36:28+5:30

ठाणे : आधीच डबघाईत असलेल्या ठाणे परिवहनसेवेचे आर्थिक चाक कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या लॉकडाऊनमध्ये पूर्णपणे पंक्चर झाले आहे. उत्पन्न ...

TMT's wheel puncture due to lockdown | लॉकडाऊनमुळे टीएमटीचे चाक पंक्चर

लॉकडाऊनमुळे टीएमटीचे चाक पंक्चर

Next

ठाणे : आधीच डबघाईत असलेल्या ठाणे परिवहनसेवेचे आर्थिक चाक कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या लॉकडाऊनमध्ये पूर्णपणे पंक्चर झाले आहे. उत्पन्न आणि खर्चाचा ताळमेळ बसविताना नाकीनऊ येत आहेत. महिनाकाठी जेमतेम एक ते दीड कोटींच्या आसपास उत्पन्न येत असताना, खर्च मात्र तिप्पट होत आहे. त्यामुळे खासगी ठेकेदाराचे पैसेही टप्प्याटप्प्याने दिले जात आहेत, तर डिझेल आणि सीएनजीपोटीच तीन ते चार कोटींचा खर्च होत आहे. त्यात पालिकेकडून येणाऱ्या अनुदानातूनच सध्या येथील कर्मचाऱ्यांचा पगार निघत आहे.

ठाणे परिवहनच्या ताफ्यात ३५० हून अधिक बस असून, यातील २९० बस या खासगी ठेकेदाराच्या माध्यमातून रस्त्यावर धावत आहेत. त्यातून लॉकडाऊनपूर्वी परिवहनचे उत्पन्न हे २३ ते २७ लाखांच्या घरात प्रति दिन गेले होते, परंतु पहिल्या आणि दुसऱ्या लॉकडाऊनमुळे परिवहनचा गाडा चिखलात रुतला असून, तो बाहेर काढणे आता कठीण होत चालले आहे. दुसऱ्या लॉकडाऊनच्या आधी परिवहनच्या २३०च्या आसपास बस रस्त्यावर धावत होत्या. त्यातून परिवहनला १५ ते १६ लाखांचे उत्पन्न मिळत होते. एक लाखाच्या आसपास प्रवासी रोज बसेसमधून प्रवास करीत होते, परंतु आता १८०च्या आसपास बस रस्त्यावर उतरवल्या जात आहेत. त्यातून केवळ एका सीटवर एकाच प्रवाशास प्रवासाची मुभा असल्याने रोज परिवहनमधून ४० हजारांच्या आसपास प्रवासी प्रवास करीत असून, यातून केवळ सहा लाखांच्या आसपासच उत्पन्न मिळत आहे. यामुळे महिन्याला एक ते दीड कोटींच्या आसपासच उत्पन्न मिळत आहे. त्यातून परिवहनचा गाडा कसा हाकायचा, असा पेच परिवहन प्रशासनाला सतावू लागला आहे. महापालिकेकडून मिळणाऱ्या अनुदानातूनच कर्मचाऱ्यांचा कसाबसा पगार निघत आहे.

दुरुस्ती अभावी अनेक बस धूळखात

बसची दुरुस्ती होत नाही, टायर बदलण्यासाठी पैसे नसल्याने त्या आगारातच धूळखात आहेत. व्होल्वोच्या केवळ नऊ बस रस्त्यावर उतरविण्याची तयारी परिवहनने केली आहे, परंतु उर्वरित २१ बस बंद आहेत. सीएनजी, डिझेल यासाठी महिनाकाठी एक कोटींच्या आसपास खर्च जात आहे. जीसीसीचे पेमेंट पाच ते सहा कोटी द्यावे लागत आहे. त्यातून ते आता ५० टक्क्यांच्या आसपास दिले जात हाेते, परंतु आता तेही थांबविले आहे.

Web Title: TMT's wheel puncture due to lockdown

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.