ठाणे : ठाणे परिवहनने आपल्या कर्मचाऱ्यांचे महागाई, वैद्यकीय, प्रवास,प्रोत्साहन आणि शैक्षणिक भत्ते अशावेगवेगळ्या देय रकमांपैकी ३७ कोटी रुपये थकवले आहे. त्यामध्ये सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या निवृत्तीवेतनापोटी देय असलेल्या १५ कोटी ५१ लाखांचा समावेश आहे. आपल्याच कर्मचाऱ्यांना अशी सापत्न वागणूक देण्यामुळे, तर परिवहनसेवेचे टायर पंक्चर झालेले नाही ना, असा सवाल प्रवासी करीत आहेत.परिवहनच्या बसगाड्यांतून प्रवास करणाऱ्या पोलिसांच्या ग्रॅण्टची १८ कोटी ६० लाखांची रक्कम अद्याप परिवहनसेवेस प्राप्त झालेली नाही. वेगवेगळ्या सरकारी खात्यांमधील समन्वयाचा अभाव हेच या थकबाकीचे कारण असल्याचे बोलले जात आहे. कर्मचाऱ्यांच्या थकबाकीचा मुद्दा ठळकपणे समोर आला आहे. मार्च २०१७ अखेरपर्यंत कर्मचाऱ्यांची थकीत रक्कम ३७.४९ कोटी एवढी आहे. यामध्ये पाचव्या वेतन आयोगानुसार महागाईभत्त्याच्या फरकापोटी देय असलेल्या ९ कोटी २५ लाख २५ हजार ७८८ पैकी ९ कोटी ४ लाख ३३ हजार ९४५ रुपयांची रक्कम अदा केली, एवढीच काय ती कर्मचाऱ्यांकरिता दिलाशाची बाब आहे. सहाव्या वेतन आयोगापोटी तब्बल २४ कोटी २९ लाख ४ हजार ६२८ रुपयांची थकबाकी आहे. सार्वजनिक सुट्यांपोटी ४ लाख ३० हजार, वैद्यकीयभत्त्यापोटी २ कोटी ६३ लाख ६० हजार, रजा प्रवासभत्ता ५ कोटी ८१ हजार ६७ हजार १००, प्रोत्साहनभत्ता ३५ लाख ५८ हजार ३०० आणि शैक्षणिक भत्त्यापोटी ९ लाख असे मिळून तब्बल ३७ कोटी ४८ लाख ९० हजार २८ रुपयांची थकबाकी असल्याची माहिती अर्थसंकल्पात नमूद करण्यात आली आहे. सहाव्या वेतन आयोगाच्या महागाईभत्त्याच्या फरकापोटी २४ कोटी ८ लाख इतक्या रकमेची मागणी महापालिकेने अनुदान म्हणून द्यावी, अशी मागणी केली आहे.विद्यमान कर्मचाऱ्यांना वाटाण्याच्या अक्षता लावणाऱ्या प्रशासनाने सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचीदेखील २००४ ते जून २०१४ पर्यंत १५ कोटी ५९ लाखांची देणी शिल्लक ठेवली आहेत. या कालावधीत ३५० कर्मचारी सेवानिवृत्त झाले असून त्यांना दरमहा ४० लाखांपर्यंत निवृत्तीवेतन अदा करणे बंधनकारक आहे. परंतु, परिवहनची आर्थिक स्थिती भक्कम नसल्याने परिवहनला ही रक्कम देणे शक्य नसल्याची कबुली देण्यात आली आहे. परिवहनच्या सेवेचा पोलीस नेहमीच वापर करतात. पोलिसांकडून त्यापोटी येणारी ग्रॅण्ट २०१० ते २०१७ या काळात प्राप्त झालेली नसल्याने १८ कोटी ६० लाखांची थकबाकी आहे. या शिल्लक रकमेतील ३ वर्षांचे ४ कोटी १३ लाख मार्च २०१८ पर्यंत परिवहनला मिळतील, अशी अपेक्षा आहे. २०१५-१६ मध्ये ३ वर्षांची ४ कोटी ८१ लाखांची रक्कम परिवहन सेवेस प्राप्त झाली होती. (प्रतिनिधी) कर्मचाऱ्यांना दिलासाच्मार्च २०१७ अखेरपर्यंत कर्मचाऱ्यांची थकीत रक्कम ३७.४९ कोटी एवढी आहे. यामध्ये पाचव्या वेतन आयोगानुसार महागाईभत्त्याच्या फरकापोटी देय असलेल्या ९ कोटी २५ लाख २५ हजार ७८८ पैकी ९ कोटी ४ लाख ३३ हजार ९४५ रुपयांची रक्कम अदा केली, एवढीच काय ती कर्मचाऱ्यांकरिता दिलासाची बाब आहे. सहाव्या आयोगापोटी २४ कोटी २९ लाख ४ हजार ६२८ रुपयांची थकबाकी आहे.
टीएमटी कर्मचाऱ्यांची थकबाकी
By admin | Updated: March 26, 2017 04:33 IST