टिटवाळा : गेली सात वर्षांपासून टिटवाळ््यात कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेची बससेवा सुरू करण्यात यावी यासाठी सुरु असलेल्या प्रयत्नांना अखेर यश आले. मंगळवारी टिटवाळा रेल्वे स्थानक ते गणपती मंदिर या बससेवेचे उद्घाटन उपमहापौर मोरेश्वर भोईर व परिवहन सभापती संजय पावशे यांच्या हस्ते करण्यात आले. टिटवाळ््यातील रहिवासी आणि भाविकांनी या निर्णयाचे स्वागत केले.कल्याण-डोंबिवली महापालिका स्थापन झाल्यानंतर कल्याण-गोवेली-टिटवाळा तसेच कल्याण-मोहने-टिटवाळा अशी बससेवा सुरू करण्यात आली होती. काही महिने ही सेवा सुरळीत सुरू राहिल्यानंतर कालांतराने अचानक बंद झाली. टिटवाळा हे शहर महागणपती मंदिरामुळे प्रसिद्ध आहे. गणपती दर्शनाकरिता रोज हजारो भाविक येतात. भाविकांच्या सोयीकरिता टिटवाळा रेल्वे स्थानक ते गणपती मंदिर अशी बससेवा सुरु करण्याकरिता २०१० पासून नगरसेविका उपेक्षा भोईर या सतत महापालिकेकडे पाठपुरावा करीत होत्या. अखेर त्यांच्या प्रयत्नाला यश आले आणि मंगळवारी रेल्वे स्थानक ते गणपती मंदिर बससेवा सुरु झाली. यावेळी परिवहन व्यवस्थापक देविदास टेकाळे, आगर व्यवस्थापक संदीप भोसले, टिटवाळा पोलीस निरीक्षक प्रदीप कसबे, नगरसेविका उपेक्षा भोईर, परिवहन सदस्य नाना यशवंतराव, मनोज चौधरी, कल्पेश जोशी राजू जोशी,जेष्ठ कार्यकर्ते अण्णा वाणी, माजी नगरसेवक सुरेश भोईर व शेकडो नागरीक उपस्थित होते. या सर्वांनी टिटवाळा रेल्वे स्थानक ते गणपती मंदिर असा प्रवास केला. त्यानंतर गणपतीबाप्पाचे दर्शन घेतले. (वार्ताहर)
टिटवाळा स्थानक ते गणपती मंदिर बससेवा
By admin | Updated: April 26, 2017 00:16 IST