ठाणे : चोरीचा माल विकत घेणा-या ठाण्यातील व्यापा-यासह महंमद उर्फ एम.डी. जिरू शेख (३५, रा. भिवंडी) आणि बब्बर गोसम खान (३६, रा. मुंब्रा) अशा तिघांना ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या मालमत्ता गुन्हे शोध पथकाने अटक केली आहे. त्यांना ठाणे न्यायालयाने २६ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.भिवंडीतील वळगाव परिसरात पद्मावती कम्पाउंडमधील प्रेरणा कॉम्प्लेक्समध्ये प्रियांक गेसोटा यांच्या प्रोफेशनल केअर या के ४ आणि ५ वेअरहाउसमध्ये १ ते ६ डिसेंबर २०१७ या कालावधीत चोरी झाली होती. गोदामाच्या शटरची कुलुपे तोडून चोरट्यांनी नामांकित कंपन्यांचे एलईडी लाइटचे पाच लाख तीन हजार ५४१ रुपयांचे ५७ बॉक्स चोरले होते. याप्रकरणी नारपोली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल झाली होती. नारपोली पोलीस आणि मालमत्ता गुन्हे शोध पथकाकडून या प्रकरणाचा तपास सुरू असताना याच परिसरातील दोन कामगार चोरीच्या दिवसापासून बेपत्ता असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक यशवंत चव्हाण यांना मिळाली होती. तिच्या आधारे सहायक पोलीस आयुक्त एन.टी. कदम यांच्या मार्गदर्शनाखाली सुरुवातीला महंमद ऊर्फ एमडीला सहायक पोलीस निरीक्षक प्रमोद सानप, उपनिरीक्षक बाबासाहेब मुल्ला आणि कॉन्स्टेबल अरविंद शेजवळ आदींच्या पथकाने मुंबईतील मशीद बंदर रेल्वेस्थानक परिसरातून अटक केली. त्यानेच दिलेल्या माहितीच्या आधारे बब्बर खान याला त्याच्या मुंब्य्रातील घरातून ताब्यात घेतले. अन्य तीन साथीदारांसह ही चोरी केल्याची त्याने कबुली दिली. शिवाय, मुंब्रा येथील व्यापारी रोशन ऊर्फ राजू ओटरमल जैन (४०) या ‘राजू इलेक्ट्रिकल्स’च्या दुकानदारास हा संपूर्ण माल एक लाख ३२ हजारांमध्ये विकल्याचेही त्याने सांगितले. त्यानुसार, चव्हाण यांच्या पथकाने राजूला मुंब्य्रातील त्याच्या दुकानातून ताब्यात घेतले. त्याने विकत घेतलेला सर्वच्या सर्व ऐवज पोलिसांनी त्याच्याकडून जप्त केला. त्यांच्या आणखी तीन साथीदारांचा पोलीस शोध घेत आहेत.
चोरीचा माल विकत घेणा-या तिघांना बेड्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2017 06:10 IST