ठाणे : ठामपा क्षेत्रातील वाईन शॉप मालक आणि ज्वेलर्स यांच्याकडून सन २०१० ते २०१३ या काळात जकातकर आणि दंडापोटी सुमारे ६०० कोटींचे येणे बाकी आहे. सर्वसामान्यांकडून थकबाकी वसूल करण्यासाठी त्यांच्या दारात ढोलताशे वाजवणारे बड्या थकबाकीदारांना आजवर पाठीशी का घालत आहेत, असा सवाल आ. संजय केळकर यांनी केला आहे. घोटाळेबाज आणि या कामात कुचराई करणाऱ्या अधिकाऱ्यांवर तातडीने कारवाई करा. अन्यथा याबाबतचा लढा आणखी तीव्र करू, असा इशाराही त्यांनी दिला. पालिका हद्दीतील विविध नागरी सुविधा आणि समस्यांबाबत केळकर यांनी पालिका मुख्यालयात प्रभारी आयुक्त सुनील चव्हाण यांची भेट घेतली आणि ठाणे शहर, दिवा भागातील समस्यांचा पाढा वाचला. त्या तातडीने सोडवण्याची मागणी केली. उच्च न्यायालयाने वसुलीचे निर्देश दिले असतानाही योग्य वसुली न झाल्याबद्दल न्यायालयाने नाराजी व्यक्त करीत प्रशासनावर ताशेरे ओढल्याची आठवण त्यांनी करून दिली. एकीकडे स्टोअरेज शुल्कात वाढ केल्याने लहान उद्योजकांचे कंबरडे मोडले आहे. पाणीपट्टीच्या नव्या धोरणानुसार सामान्यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे तर कचरा कर वाढवून पालिकेच्या उत्पन्नात भर घालण्याचा प्रयत्न सुरु आहे. ठामपाचे उत्पन्न वाढवण्यासाठी कमी उत्पन्न देणाऱ्या बाबींकडे अधिक लक्ष देणाऱ्या प्रशासनाकडून कोट्यवधी रुपयांच्या थकबाकीकडे दुर्लक्ष झाल्याने अतोनात नुकसान झाल्याचे केळकर यांनी निदर्शनास आणले. या प्रकरणी त्यांनी मुख्यमंत्री आणि प्रधान सचिवांना लेखी पत्र देऊन कारवाईची मागणी केली आहे. (प्रतिनिधी)
ठामपाची ६०० कोटी जकात थकबाकी
By admin | Updated: December 28, 2016 04:07 IST