यंदाचा गंधार गौरव पुरस्कार महेश कोठारे यांना प्रदान

By ऑनलाइन लोकमत | Published: November 16, 2023 08:07 AM2023-11-16T08:07:57+5:302023-11-16T08:08:03+5:30

भव्यदिव्य बालनाट्य रंगभूमीवर आणण्याची इच्छा

This year's Gandhar Gaurav award was presented to Mahesh Kothare | यंदाचा गंधार गौरव पुरस्कार महेश कोठारे यांना प्रदान

यंदाचा गंधार गौरव पुरस्कार महेश कोठारे यांना प्रदान

ठाणे :  मराठी चित्रपटसृष्टीतील सुपरस्टार, चतुरस्त्र अभिनेते, दिग्दर्शक महेश कोठारे यांना यंदाचा गंधार गौरव पुरस्कार मंगळवारी राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण आणि मुंबई भाजपचे अध्यक्ष ॲड. आशिष शेलार यांच्या हस्ते गडकरी रंगायतन येथे प्रदान करण्यात आला. बालनाट्य क्षेत्रात भव्य कलाकृती निर्माण करण्याची इच्छा आहे, त्यासाठी गंधार या संस्थेला सोबत घेतले जाईल, अशी इच्छा कोठारे यांनी व्यक्त केली. 

गंधारतर्फे मंगळवारी गंधार गौरव सोहळ्याचे आयोजन केले होते. यावेळी कोठारे यांना ज्येष्ठ संगीतकार अशोक पत्की, ज्येष्ठ अभिनेते विजय गोखले, ज्येष्ठ साहित्यिक डॉ. प्रदीप ढवळ, आ. संजय केळकर, माजी खा. डॉ. संजीव नाईक, शिवसेना प्रवक्ते नरेश म्हस्के, माजी नगरसेवक संजय वाघुले, अभिनेते, निर्माते मंगेश देसाई, दिग्दर्शक विजू माने, गंधारचे सर्वेसर्वा मंदार टिल्लू, सचिन मोरे यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला. बालनाट्य हा कलाप्रकार लुप्त होत असल्याची खंत व्यक्त करत कोठारे म्हणाले की, रंगभूमीवर पहिले पाऊल सुधा करमरकर यांच्यामुळे ठेवू शकलो. 

मराठी चित्रपटसृष्टीला वैभव प्राप्त
रवींद्र चव्हाण म्हणाले की, मराठी चित्रपटसृष्टी आम्ही आपल्यापासून पाहायला सुरुवात केली. लक्ष्मीकांत बेर्डे आणि आपण मराठी चित्रपटसृष्टीला वैभव प्राप्त करून दिले. बालकांमध्ये आत्मविश्वास निर्माण करण्याचे काम गंधार सारख्या संस्था करतात. गंधार अनेक कलाकार, व्यक्तिमत्त्व घडवत आहेत. ठाण्याबाहेरही संस्थेचे काम सुरू आहे, त्याबद्दल त्यांचे कौतुक वाटते.

मचित्रपटसृष्टी कात टाकतेय
दिग्दर्शक माने म्हणाले की, मराठी चित्रपटसृष्टी कात टाकत आहे. याचे कारण महेश कोठारे, सचिन पिळगावकर यांनी ही चित्रपटसृष्टी जगवली.  हा पुरस्कार गौरवापेक्षा कृतज्ञता पुरस्कार आहे. मराठी चित्रपटसृष्टी खडतर काळातून जात असताना त्यांनी मराठी सिनेमा जिवंत ठेवला. यावेळी ज्ञानदा रामतीर्थकर, दत्तू मोरे, आदित्य दवणे, हेमंत सोनावणे, सुकन्या काळण यांना गंधार युवा पुरस्कार तर यावर्षी कला संस्कृती कलावेधक संस्था, कल्याण, रंगायतन महोत्सव यांना बालनाट्य संस्था पुरस्कार प्रदान करण्यात आला.

बालसाहित्य निर्मितीला मर्यादा
ॲड. शेलार म्हणाले की, त्या काळात महेश कोठारे आणि त्यांच्यासारख्या कलाकारांनी मराठी सिनेमा टिकवला नसता तर मराठी सिनेमांना आलेले आजचे दिवस पाहायला मिळाले नसते. नवीन काहीतरी करायचे आहे हा त्यांच्या मनाशी कायम सुरू असलेला संघर्ष आहे. बालनाट्य, बालसंगीत, बालसाहित्य ही चळवळ पुनर्स्थापित करण्याचे काम गंधार करत आहे. बालनाट्यासाठी नाट्यगृहात जागा नाही. बालसाहित्य निर्मितीच्या मर्यादा  आहेत. किंबहुना ते बाजारातच नाही आणि यातून व्यवसाय होईल याची शाश्वती नाही, अशी नाराजी त्यांनी बोलून दाखविली.

Web Title: This year's Gandhar Gaurav award was presented to Mahesh Kothare

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.