यंदा १ ते ३ डिसेंबरमध्ये रंगणार पं. राम मराठे संगीत महोत्सव; संगीत महोत्सवाचे २८वे वर्ष

By प्रज्ञा म्हात्रे | Published: October 30, 2023 01:58 PM2023-10-30T13:58:06+5:302023-10-30T14:02:16+5:30

पं. राम मराठे यांचे जन्मशताब्दी वर्ष,

This year, from 1st to 3rd December, Pt. Ram Marathe Music Festival; | यंदा १ ते ३ डिसेंबरमध्ये रंगणार पं. राम मराठे संगीत महोत्सव; संगीत महोत्सवाचे २८वे वर्ष

यंदा १ ते ३ डिसेंबरमध्ये रंगणार पं. राम मराठे संगीत महोत्सव; संगीत महोत्सवाचे २८वे वर्ष

ठाणे : ठाणे महानगरपालिकेतर्फे आयोजित करण्यात येणारा संगीतभूषण पं. राम मराठे संगीत महोत्सव यंदा १ डिसेंबर ते ३ डिसेंबर या काळात होणार आहे. या महोत्सवात पं. सुरेश तळवलकर यांना राज्यस्तरीय तसेच निषाद बाक्रे यांना युवा पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे.

संगीतभूषण पं. राम मराठे संगीत महोत्सवाची माहिती सोमवारी ठाणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त (१) संदीप माळवी, अतिरिक्त आयुक्त (२) प्रशांत रोडे यांनी पत्रकार परिषदेत दिली. याप्रसंगी, उपायुक्त (माहिती व जनसंपर्क) उमेश बिरारी उपस्थित होते.

राम गणेश गडकरी रंगायतन येथे तीन दिवस हा महोत्सव होणार असून महोत्सवाचे हे २८वे वर्ष आहे. तसेच, पं. राम मराठे यांचे जन्मशताब्दी वर्ष यांचे हे जन्म शताब्दी वर्ष असल्याने त्याच्यासोबत काम केलेल्या सात ज्येष्ठ कलाकारांचा यावेळी कृतज्ञता सन्मान करण्यात येणार असल्याचे संदीप माळवी यांनी सांगितले. तसेच, हा महोत्सव विनामूल्य असून रसिकांनी कार्यक्रमांना भरभरून प्रतिसाद द्यावा, असे आवाहनही माळवी यांनी केले.

 याही वर्षी महोत्सवात नामवंत आणि ज्येष्ठ कलाकार तसेच नवोदित कलाकार यांचा सुरेल संगम रसिकांना अनुभवता येणार आहे. महोत्सवाचा आरंभ शुक्रवार १ डिसेंबर रोजी सायंकाळी पं. राम मराठे यांचे नातू युवा कलाकार भाग्येश मराठे यांच्या गायनाने होईल. त्यानंतर पुरस्कार वितरण सोहळा होईल. पहिल्या दिवसाची सांगता ज्येष्ठ सरोद वादक सुजात खान यांच्या सरोद वादनाने होईल.

     शनिवार, २ डिसेंबर रोजी दुपारी ज्येष्ठ वादक भीमण्णा जाधव यांच्या सुंदरी वादनाने आरंभ होईल. त्यानंतर, नृत्यांगना आणि अभिनेत्री शर्वरी जमेनिस यांचे नृत्य होईल. त्यांना तबला साथ पं. मुकुंदराज देव करणार आहेत. सांगता ज्येष्ठ गायिका शुभा मुदगल यांच्या गायनाने होईल. त्यांना अनिश प्रधान आणि सुधीर नायक हे साथसंगत करणार आहेत. रविवार, ३ डिसेंबर रोजी सकाळच्या सत्रात युवा कलाकार शाश्वती चव्हाण यांचे गायन आणि मंजिरी वाठारे यांचे नृत्य होईल. दुपारच्या सत्रात संगीत मंदारमाला या नाटकाचा प्रयोग होणार आहे. त्याचे दिग्दर्शन पं. राम मराठे यांचे पुत्र मुकुंद मराठे यांचे आहे. तर, महोत्सवाची सांगता ज्येष्ठ गायिका अश्विनी भिडे देशपांडे आणि ज्येष्ठ गायक पं. संजीव अभ्यंकर यांच्या 'जसरंगी' या कार्यक्रमाने होणार आहे.

Web Title: This year, from 1st to 3rd December, Pt. Ram Marathe Music Festival;

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.