ठाणे : वाघ, बिबट्या आणि मगरीच्या कातड्यांसह दोन हस्तिदंतांची तस्करी करणाऱ्या मुंबईतील समीर शांताराम जाधव (३७) याला गुरुवारी ठाणे शहर पोलिसांच्या खंडणीविरोधी पथकाने अटक केली. त्याच्याकडून हस्तगत केलेल्या ऐवजाची भारतीय किंमत ४५ लाख रुपये असून, आंतरराष्टÑीय बाजारपेठेतील त्याची किंमत अंदाजे दोन कोटी रुपये असण्याची शक्यता आहे. वाघ हे विदर्भात असल्याने त्याचे काही विदर्भ कनेक्शन आहे का, याचाही शोध घेण्यात येणार असल्याची माहिती ठाणे गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त दीपक देवराज यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत दिली.ठाण्यातील बाळकुम-माजिवडा रोडवर वन्यजीव प्राण्यांचे कातडे व हस्तिदंतांची तस्करी करणारा एक जण त्याच्या विक्रीसाठी येणार असल्याची माहिती ठाणे खंडणीविरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप शर्मा यांना मिळाली होती. त्यानुसार, गुरुवारी दुपारी वनअधिकाऱ्यांसह खंडणीविरोधी पथकाने सापळा रचून मुंबईतील मालाड येथे राहणाºया समीर याला ताब्यात घेतले. तो व्यवसायाने वाहनचालक आहे. त्याच्याकडून जप्त केलेल्या वाघ आणि बिबट्याच्याकातड्यावरून ते प्राणी लहान असण्याची शक्यता आहे. तर, मगरीमध्ये भुसा भरण्यात आलेला आहे. त्याने हे कातडे आणि हस्तिदंत कुठून आणले तसेच तो कोणाला विकण्यासाठी आला होता. तसेच तो सराईत आहे का, याबाबत शोध घेण्याचे काम सुरू आहे. या प्रकरणी कापूरबावडी पोलिसात वन्यजीव संरक्षण कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल करून त्याला अटक केली. त्याला शुक्रवारी ठाणे न्यायालयात हजर करण्यात येणार असल्याचे देवराज यांनी सांगितले. ही कारवाई पोलीस निरीक्षक विकास घोडके, पोलीस उपनिरीक्षक विकास बाबर, हेमंत ढोले, रोशन देवरे, विलास कुटे, सहायक पोलीस निरीक्षक भिवणकर या पथकाने केली.
ठाण्यात वाघ, बिबट्या, मगरीच्या कातडीसह हस्तिदंत तस्करास अटक
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 17, 2019 01:59 IST