ठाणे - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि माझ्यात काेणतीही कटुता नाही. त्यांची परवानगी घेऊनच मलंगगड यात्रेसाठी आपण गेलाे हाेताे. त्यामुळेच नगरविकास विभागाच्या बैठकीला आपण अनुपस्थित हाेताे, असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुरुवारी ठाण्यातील टेंभी नाका येथील राजन साळवी यांच्या पक्षप्रवेशाच्या वेळी स्पष्ट केले.
एका मराठी माणसाकडून मराठी माणसाचा सन्मान झाल्यावर खरेतर अभिमान वाटायला हवा होता. पण त्यांचा किती जळफळाट झाला, अशा शब्दांत एकनाथ शिंदे यांनी उद्धवसेनेचा समाचार घेतला. शरद पवार यांच्या हस्ते दोनच दिवसांपूर्वी महादजी शिंदे राष्ट्रगौरव पुरस्कार देऊन उपमुख्यमंत्री शिंदे यांचा सन्मान करण्यात आला होता त्यावरून ठाकरे यांच्या शिवसेनेने पवारांवर तोंडसुख घेतले होते. त्यावरही शिंदे यांनी टीका केली. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आपल्यात कोणतेही वितुष्ट नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.