सदानंद नाईक, उल्हासनगर : कॅम्प नं-३ मधील उल्हासनगर रेल्वे स्टेशनला जोडणाऱ्या वालधुनी नदीवरील पुलाचे उदघाटन व नामांतरण शुक्रवारी महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी केले. पुलाला डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्याची मागणी यावेळी पदाधिकाऱ्यांनी केली.
उल्हासनगर कॅम्प-३ येथील रेल्वे स्टेशनला जोडणारा वालधुनी नदीवरील पूल नव्याने बांधण्यात आला. मात्र पूलाचे लोकार्पण झाले नसल्याने, वाहनास जाण्यास मनाई आहे. अखेर शुक्रवारी महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी एकत्र येत क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंती निमित्त पुलाचे उद्घाटन केले. तसेच सदर पुलाला भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव द्यावे. अशी मागणी केली. या नावाला स्थानिक नागरिकांनाचा पाठिंबा असल्याची माहिती शिवाजी रगडे यांनी दिली. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाचे फलक पुलावर लावण्यात आले. दरम्यान महापालिका प्रशासनाने आता हेच नाव पुलाला देऊन मोठे फलक लावावे. असी मागणी स्थानिकांनी केली.
वालधुनी पुलाचे उदघाटन व नामांतर वेळी शरद पवार गटाचे शहर प्रवक्ते शिवाजी रगडे, ठाकरे गटाचे उपशहर प्रमुख भगवान मोहिते, विभाग प्रमुख दशरथ चौधरी, आदिनाथ पालवे यांच्यासह अशोक जाधव, मॉन्टी राजपुत, शशी भुषण सिंग, साहेबराव ससाणे, मॅडी स्टलिन, साऊद खान, ॲड महेश फुंदे, अझीझ शेख, सिराज खान आदिजण उपस्थित होते.