लोकमत न्यूज नेटवर्कशहापूर : मासिक पाळी संदर्भात वादग्रस्त ठरलेल्या येथील इंग्रजी माध्यमाची शाळा बंद ठेवण्याचा निर्णय संस्था चालकांनी घेतला. परंतु विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये म्हणून शिक्षण विभागाने मंगळवारपासून शाळा सुरळीत सुरू करण्याचे आदेश दिले. मात्र या प्रकरणासंदर्भात खुलासा आणि शाळा चालविण्यासाठी आवश्यक नियम व निकष येत्या १५ दिवसांत पूर्ण करण्याचे निर्देश शिक्षण विभागाने दिले आहेत.
पालक आणि शिक्षक यांची सोमवारी बैठक पार पडली. या बैठकीस प्राथमिक शिक्षण अधिकारी बाळासाहेब राक्षे, माध्यमिक शिक्षण अधिकारी देवीदास महाजन, गट शिक्षणाधिकारी रामचंद्र विशे, पोलिस उपाधीक्षक मिलिंद शिंदे, तहसीलदार परमेश्वर कासुळे, आमदार दौलत दरोडा, संस्थेचे समन्वयक जे. डी. भुतांगे शिक्षक उपस्थित होते.
उणिवांकडे वेधले लक्ष बैठकीत शाळेची मान्यता रद्द करू नये अशी मागणी अनिल निचिते यांनी केली. तसेच शाळेच्या इमारतीचे व्यवस्थापन, शिक्षक भरती, कार्यकारी मंडळ, शिक्षक-पालक संघ, सखी सावित्री समिती, विशाखा समिती, परिवहन समिती, महिला तक्रार समिती, तक्रारपेटी या उणिवांकडे लक्ष वेधले.
शिक्षण विभागाने स्पष्ट केले की, शाळा चालविण्यासाठी आवश्यक असलेले नियम व निकष पंधरा दिवसांत पूर्ण करावेत. तसेच प्राथमिक व माध्यमिक विभागांसाठी स्वतंत्र मुख्याध्यापकांची नियुक्ती करावी, असेही निर्देश देण्यात आले.
कथित प्रकार घडल्यानंतर शिक्षण विभाग शाळेची मान्यता रद्द करण्याच्या प्रक्रियेकडे गांभीर्याने पाहत आहे. मात्र, सुधारणा करण्याची संधी देत शाळेला मार्गदर्शन करण्याचा निर्णय घेण्यात आला.