विशाल हळदे
ठाणे - ठाण्यातील सर्वाधिक महत्त्वाचा समजला जाणारा घोडबंदर रस्ता आज अक्षरशः खड्ड्यांच्या विळख्यात सापडला असून, रस्त्यावरील दैनंदिन प्रवाशांचे हाल भीषण झाले आहेत. “नेत्यांनी घेतली टेस्ला, घोडबंदर वासी फसला” या घोषणांनी शुक्रवारी घोडबंदर येथील आनंदनगर सिग्नलजवळ परिसर दणाणून गेला. प्रचंड खड्ड्यांमुळे नागरिकांना दररोज जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत असल्याने अखेर संतप्त नागरिकांनी साखळी आंदोलन छेडले.
आंदोलनकर्त्यांनी ठणकावले की, “सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी टेंडर काढतात; मात्र रस्त्याचे काम इतक्या निकृष्ट दर्जाचे केले जाते की काही दिवसातच डांबरी थर निघून खड्ड्यांनी संपूर्ण रस्ता व्यापतो. यामागे अधिकारी आणि ठेकेदारांचा संगनमताने चालणारा भ्रष्टाचार आहे. अधिकारी स्वतःचेच खिसे भरत आहेत, पण जनतेला मात्र नरक यातना भोगाव्या लागत आहेत.”
वाहतूक पोलिस आणि महापालिकेच्या निष्काळजीपणालाही नागरिकांनी चांगलेच धारेवर धरले. “रोज अपघात होत असतानाही कुणीच गांभीर्याने दखल घेत नाही. खड्ड्यांमुळे गाड्यांचे नुकसान, वाहतुकीत होणारी कोंडी आणि प्रवासाचा वाढणारा त्रास यामुळे नागरिकांचे हाल होत आहेत. प्रशासनाचे डोळे कधी उघडणार?” असा प्रश्न संतप्त नागरिकांनी उपस्थित केला.
दरम्यान, आंदोलकांच्या घोषणाबाजीमुळे काही काळ वाहतुकीवर परिणाम झाला होता. सार्वजनिक बांधकाम विभाग, ठाणे यांनी अक्षरशः घोडबंदर रस्त्याला खड्ड्यात घातले असून तातडीने टिकाऊ व दर्जेदार रस्त्याचे काम करण्याची मागणी आंदोलकांनी केली आहे.