ठाण्यात शुक्रवारी पं. राम मराठे संगीत महोत्सव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 2, 2019 01:53 AM2019-12-02T01:53:21+5:302019-12-02T01:53:33+5:30

शनिवार, ७ डिसेंबरला दुपारी ४.३० वाजता दीपा पराडकर (मुंबई) यांच्या गायनाने सत्राची सुरुवात होणार आहे.

Thane Pt. Ram Marathe Music Festival | ठाण्यात शुक्रवारी पं. राम मराठे संगीत महोत्सव

ठाण्यात शुक्रवारी पं. राम मराठे संगीत महोत्सव

Next

ठाणे : ठाण्याच्या समृद्ध भूमीत कलेचा आणि कलावंतांचा सन्मान करणारा, शास्त्रीय संगीताचा वसा आणि वारसा जोपासणाऱ्या प्रतिष्ठेच्या पंडित राम मराठे संगीत महोत्सवाला यावर्षी ६ डिसेंबर २०१९ पासून सुरु वात होत आहे. ठाणे महापालिका आणि अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, ठाणे शाखा यांच्या विद्यमाने या संगीत समारोहाचे आयोजन करण्यात आले आहे. नृत्य, नाट्य, गायन, वादन आदी क्षेत्रांतील दिग्गज कलाकारांच्या कला सादरीकरणाने यंदाचा पं. राम मराठे संगीत महोत्सव साजरा होणार आहे. ६ ते ८ डिसेंबर या कालावधीत राम गणेश गडकरी रंगायतन येथे हा संगीत समारोह आयोजित करण्यात आला असल्याची माहिती ठाणे महापौर नरेश म्हस्के यांनी दिली.
या संगीत स्मृती समारोहाचे उद्घाटन शिवसेना विधिमंडळ गटनेते, शिवसेना नेते तथा राज्याचे मंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते, ज्येष्ठ गायक प्रभाकर कारेकर, खासदार राजन विचारे, खा.डॉ. श्रीकांत शिंदे, डॉ. विनय सहस्रबुद्धे, कुमार केतकर, आमदार प्रताप सरनाईक, डॉ. जितेंद्र आव्हाड, संजय केळकर, प्रमोद पाटील, निरंजन डावखरे, रवींद्र फाटक, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रसाद कांबळी यांच्या उपस्थितीत आणि महापौर नरेश म्हस्के यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होणार आहे. यावेळी उपमहापौर पल्लवी पवन कदम, स्थायी समिती सभापती राम रेपाळे, विरोधी पक्षनेते मिलिंद पाटील, महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल, क्र ीडा व सांस्कृतिक समिती सभापती अमर ब्रह्मा पाटील, नौपाडा-कोपरी प्रभाग समिती अध्यक्षा नम्रता पमनानी आदी उपस्थित राहणार आहेत.
संगीत समारोहाच्या पहिल्या दिवसाची सुरु वात ६ डिसेंबरला रात्री ७ वाजण्याच्या सुमारास प्रसिद्ध बासरीवादक सूरमणी विवेक सोनार यांच्या बासरीवादनाने होणार आहे. त्यानंतर संगीतभूषण पं. राम मराठे स्मृती पुरस्काराचे वितरण होणार आहे. प्रख्यात गायक उस्ताद राशीद खान यांच्या गायनाने पहिल्या दिवसाच्या सत्राचा समारोप होणार आहे.
शनिवार, ७ डिसेंबरला दुपारी ४.३० वाजता दीपा पराडकर (मुंबई) यांच्या गायनाने सत्राची सुरुवात होणार आहे. त्यानंतर श्रद्धा शिंदे यांचे कथ्थक नृत्याचे सादरीकरण होणार आहे. सायंकाळी ६ वाजता यशश्री कडलासकर (पुणे) आणि रमाकांत गायकवाड (पुणे) यांचे शास्त्रीय गायन होणार आहे.
दुसºया दिवसाचे सत्र रात्री ८.३० वाजता सुरू होणार असून पं. राजेंद्र गंगाणी हे कथ्थक नृत्याचे सादरीकरण करणार आहेत.

पं. विजय कोपरकर, पं. सुरेश बापट सादर करणार वैभवशाली संगीताचा ठेवा
- ८ डिसेंबरला दुपारी ४.३० वाजता पं. वसंतराव देशपांडे जन्मशताब्दी वर्षानिमित्त वसंत-वैभव या कार्यक्र माचे आयोजन केले आहे. यामध्ये प्रसिद्ध गायक पं. विजय कोपरकर व पं. सुरेश बापट हे पं. वसंतराव देशपांडे यांच्या वैभवशाली संगीताचा ठेवा सादर करणार आहेत.

या कार्यक्र माचे निवेदन नरेंद्र बेडेकर करणार आहेत. ८ डिसेंबर रोजी सायंकाळी ६ वाजता स्वरांगी मराठे व प्राजक्ता मराठे यांचे सहगायन होणार आहे. या कार्यक्र माच्या शेवटच्या सत्रात प्रख्यात गायिका विदुषी डॉ. प्रभा अत्रे यांच्या शास्त्रीय गायनाने कार्यक्र माचा समारोप होणार आहे.
या समारोहासाठी प्रवेश विनामूल्य असून रसिकांना प्रवेशिका कार्यक्र मापूर्वी एक तास आधी गडकरी रंगायतन येथे उपलब्ध होतील. ठाण्याच्या संगीतप्रेमी रसिकांनी या संगीत पर्वणीचा लाभ घ्यावा, असे आवाहन ठाणे महापालिका तसेच अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने केले आहे.

 

Web Title: Thane Pt. Ram Marathe Music Festival

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :thaneठाणे