ठाण्यातील भातसा नदीकाठी कपडे धुण्यासाठी गेलेल्या मायलेकांसह भाचीचाही पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना घडली. अंघोळीसाठी पाण्यात उतरलेला मुलगा बुडत असल्याचे पाहून त्याच्या आईने पाण्यात उडी मारली. परंतु, दोघेही बुडू लागल्याने त्यांना वाचवण्यासाठी भाचीनेही पाण्यात उडी मारली. तिघांनाही पोहता येत नसल्याने त्यांचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाल्याने परिसरात शोककळा पसरली.
मिळालेल्या माहितीनुसार, लक्ष्मी दत्तात्रय पाटील (वय, ५०) त्यांचा मुलगा धीरज दत्तात्रय पाटील (वय, १७) आणि भाची वनिता शेळके (वय, ३३) अशी मृतांची नावे आहेत. लक्ष्मी आणि वनिता कपडे धुत असताना धीरज अंघोळीसाठी पाण्यात उतरला. परंतु, खोलीचा अंदाज न आल्याने तो पाण्यात बुडू लागला. त्याला वाचवण्यासाठी लक्ष्मी यांनी पाण्यात उडी मारली. दोघेही पाण्यात बुडत असल्याचे वनिताने बघितले आणि त्यांना वाचवण्यासाठी तिनेही पाण्यात उडी घेतली. दुर्दैवाने, तिघांनाही पोहता येत नसल्याने त्यांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला.
भातसा नदीत तीन जण बुडल्याचे माहिती मिळताच शहापूर पोलीस आणि रेस्क्यू टीमने घटनास्थळी दाखल होऊन मायलेकासह तिघांचे मृतदेह पाण्याबाहेर काढले. तिघांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी उपजिल्हा रुग्णालय शहापूर येथे पाठवण्यात आले. याप्रकरणी शहापूर पोलीस ठाण्यात अपघाती मृत्युची नोंद करण्यात आली. आईसह मुलगा आणि भाचीचा नदीत बुडून मृत्यू झाल्याने कुटुंब, नातेवाईक आणि गावावर शोककळा पसरली.