लोकमत न्यूज नेटवर्क, ठाणे: घोडबंदर भागातील सेवा रस्ता मुख्य रस्त्याच्या जोडणीच्या कामाला पावसामुळे ब्रेक लागला. परंतु येत्या १५ सप्टेंबरपासून या कामाला पुन्हा सुरुवात करून ३१ डिसेंबरच्या आत हा रस्ता पूर्ण करण्याचे आदेश परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी एमएमआरडीएला दिले. तसेच या कामासाठी १५ सप्टेंबरपासूनच ३१ डिसेंबरपर्यंत येथील अवजड वाहनांची वाहतूक दिवसभर बंद ठेवून ती भिवंडीमार्गे वळविण्यात यावी आणि रात्री १२ ते सकाळी ६ पर्यंतच येथून अवजड वाहनांची वाहतूक केली जावी, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. वाहतूक बदलाचे आदेश तत्काळ काढले जावेत, अशा सूचनाही त्यांनी वाहतूक विभागाला दिल्या.
घोडबंदर रस्ता हा वाहतुकीसाठी महत्त्वाचा मानला जातो. या रस्त्यावरून अवजड वाहनासह परिसरातील वाहनांची सतत वाहतूक सुरू असते. या मार्गावरील फाउंटन हॉटेल ते गायमुख घाटपर्यंतचा रस्ता सार्वजनिक बांधकाम विभागाने मीरा-भाईंदर पालिकेला हस्तांतरित केला आहे. या रस्त्यावर दरवर्षी पावसाळ्यात मोठमोठे खड्डे पडतात.
कोंडी का होते?
घाट परिसरातील चढणीवरच खड्डे पडत असल्याने वाहनांचा वेग मंदावून प्रचंड वाहतूककोंडी होते. त्यामुळे यंदा सार्वजनिक बांधकाम विभागाने ठाण्याहून घोडबंदरकडे जाणाऱ्या रस्त्याच्या दुरुस्तीचे काम केले होते. मात्र त्यानंतर पाऊस सुरू झाल्याने त्यांना घोडबंदरवरून ठाण्याकडे येणाऱ्या मार्गिकेचे काम करणे शक्य झाले नव्हते. या मार्गाची दुरवस्था झाल्याने या पट्टयात सर्व प्रकारच्या वाहनांची वाहतूक मंदावत होती.
सरनाईक यांचे निर्देश
- घोडबंदर मार्गावर मुख्य आणि सेवा रस्ता जोडणीचे काम सुरू आहे. त्यामुळे हे काम ३१ डिसेंबरपर्यंत पूर्ण करण्याचे आदेश सरनाईक यांनी एमएमआरडीएला दिले आहेत. परिणामी डिसेंबरपर्यंत या मार्गावर रात्री १२ ते पहाटे ६ या वेळेत अवजड वाहतुकीला परवानगी देण्यात यावी.
- तसेच त्या वेळेव्यतिरिक्त दिवसा होणारी वाहतूक भिवंडीमार्गे वळवावी, अशा सूचना त्यांनी ठाणे वाहतूक शाखेचे पोलिस उपायुक्त पंकज शिरसाट यांना बैठकीत दिल्या. त्यावर शिरसाट यांनी नोटीस काढली.