जितेंद्र कालेकर, ठाणे पोलिसांवरील ताण कमी करण्यासाठी तसेच त्यांचे बळ वाढविण्यासाठी प्रत्येक पोलीस ठाण्याने आपल्या हद्दीतील २०० दक्ष तरुण-तरुणींची ‘पोलीसमित्र’ म्हणून नियुक्ती करण्याचे आदेश पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित यांनी रविवारी दिले. यामुळे ठाणे जिल्ह्याला किमान १० हजार पोलीसमित्र मिळणार आहेत. पोलीस ठाण्यांचा कारभार पारदर्शक होण्यासाठी प्रत्येक पोलीस ठाण्यात सीसीटीव्ही बसवण्याचे आदेशही त्यांनी या वेळी दिले.राज्याच्या पोलीस महासंचालकपदी नियुक्ती झाल्यानंतर प्रथमच ठाणे शहर आणि ग्रामीण पोलीस मुख्यालयात दीक्षित यांनी भेट देऊन गुन्ह्यांचा आढावा घेतला. या वेळी पोलिसांचा कारभार लोकाभिमुख व्हावा व पोलिसांवरील ताण कमी करण्याकरिता ठाणे शहरमधून पाचही परिमंडळांतील ३४ पोलीस ठाण्यांमध्ये प्रत्येकी २०० प्रमाणे ६८०० तर ठाणे ग्रामीण मधील १६ पोलीस ठाण्यांचे तीन हजार २०० असे १० हजार पोलीसमित्र तयार करण्याचे निर्देश त्यांनी दिले. ठाणे ग्रामीण आणि कोकण परिक्षेत्राचा आढावा कोकण विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक प्रशांत बुरडे यांच्याकडून घेतला. ठाणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक राजेश प्रधान हेही या वेळी उपस्थित होते. महामार्गावरील दरोडे, जबरी चोऱ्या आणि महिलांवरील अत्याचारांचे गुन्हे नियंत्रित आणण्याच्या सूचना या वेळी त्यांनी केल्या. ठाणे पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण विभागाने १० ठिकाणच्या छाप्यांमधून २२५ कोटींच्या तूरडाळीसह कडधान्याचा साठा जप्त केला आहे. या कारवाईचेही कौतुक करतानाच नागरिकांना ही डाळ अल्प दरात मिळण्यासाठी संबंधित यंत्रणेकडेही पाठपुरावा करण्याचे आदेशही त्यांनी या वेळी दिले. पोलीस लोकाभिमुख होण्यासाठी प्रत्येक पोलीस ठाण्यातील लॉकअप, ठाणे अंमलदार आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक कक्षात सीसीटीव्ही लावण्याचे आदेश त्यांनी दिले. बऱ्याचदा तक्रारदार आणि आरोपी नंतर आपले जबाब बदलतात, त्यालाही आळा बसेल. तसेच तक्रारदाराला पोलिसांकडून कशी वागणूक मिळते, यावर नियंत्रण राहील. एखादी तक्रार दाखल झाल्यानंतर फिर्यादीच्या व्हॉट्सअॅप तसेच मेलवर एफआयआरची प्रत द्या तसेच गुन्ह्याच्या पाठपुराव्याची माहिती द्या, असे आदेशही त्यांनी दिले. भुयारी मार्गाच्या वापराबरोबरच झेब्रा क्रॉसिंग रंगविण्यासाठी ठाणे पालिकेकडे पाठपुरावा करा, वाहन चोरीचे गुन्हे उघड होण्यासाठीही तसेच वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांवरही कॅमेऱ्यांच्या आधारावर कारवाई करा, असे दिक्षित म्हणाले. डीजीटल नियंत्रण कक्षातून वाहतुकीची पाहणी करतांना महिला रस्ता ओलांडतांना त्यांनी पाहिल्यावर त्यांनी झेब्रा क्रॉसिंग का दिसत नाहीत, अशी विचारणा केली आणि वरील आदेश दिले.अखेर एफआयआर अॅप लाँच भार्इंदर : महिलांसह ज्येष्ठ नागरिकांवरील वाढते हल्ले तसेच अत्याचारांपासून त्यांना संरक्षण देण्यासाठी ठाणे ग्रामीण पोलिसांच्या मीरा-भार्इंदर विभागाने प्रथमच स्मार्ट फोनमध्ये वापरता येण्याजोगे अॅप तयार केले आहे. एफआयआर (फर्स्ट इमिडिएट रिस्पॉन्स) असे या अॅपचे नाव असून दोन दिवसांपूर्वीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठाण्यात त्याचे लोकार्पण केले. त्यानंतर, १० हजारांहून अधिक लोकांनी मोबाइलमध्ये हे अॅप डाऊनलोड केले. त्याचे वृत्त लोकमतने सर्वप्रथम २४ आॅगस्टच्या अंकात प्रसिद्ध केले होते.हे अॅप लवकरच मीरा-भार्इंदरकर महिलांना उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे उपअधीक्षक सुहास बावचे यांनी सांगितले होते. हे अॅप स्मार्ट फोनमधील अॅण्ड्रॉइड तसेच अॅपल आय फोनमधील आयओएस आॅपरेटिंग सिस्टीमवर वापरता येण्याजोगे आहे. संकटात सापडलेल्या अथवा त्याच्या संपर्कात असलेल्या तसेच जवळच असलेल्या व्यक्तीला मोबाइलमधील एफआयआरवर क्लिक केल्यानंतर हेल्प बटनावर क्लिक करावे लागेल. तत्पूर्वी हे अॅप डाऊनलोड करतेवेळी युजर्सनी स्वत:ची सर्व माहिती अॅपसंबंधित अर्जात भरून त्याची नोंदणी करणे आवश्यक आहे. मदतीसाठी अॅपचा वापर केल्यास घटनास्थळाची माहिती त्वरित मीरा रोड पोलीस ठाण्यातील कंट्रोल रूमवर प्रदर्शित होऊन जवळील पोलीस ठाण्याला त्याचा अॅलर्ट देण्यात येणार आहे. त्यामुळे त्वरीत मदत पोहचणार आहे.
ठाणे जिल्ह्यात लवकरच १० हजार ‘पोलीसमित्र’
By admin | Updated: November 9, 2015 02:44 IST