ठाण्यातील मनपाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत सोमवारी मध्यरात्री धक्कादायक घटना घडली. घरच्यांनी हातातून फोन काढून घेतला म्हणून एका २० वर्षीय तरुणीने आत्महत्यासारखे टोकाचे पाऊल उचलले. याप्रकरणी मनपाडा पोलीस ठाण्यात आत्महत्येची नोंद करण्यात आली असून पोलिसांनी पुढील तपासाला सुरुवात केली आहे.
समीक्षा नारायण वड्डी असे आत्महत्या केलेल्या तरुणीचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, समीक्षा सोमवारी मध्यरात्री फोनवर बोलत होती. रात्र झाल्याने समीक्षाच्या काकांनी तिच्या हातातून फोन काढून घेतला आणि तिला झोपायला जाण्यास सांगितले. मात्र, यामुळे समीक्षाला राग अनावर झाला. ती धावत फ्लॅटच्या हॉलमध्ये गेली आणि तिने गॅलेरीतून खाली उडी मारली. यानंतर समीक्षाला ताबडतोब जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले. परंतु, तिथे डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.
याप्रकरणी मनपाडा पोलिसांत आत्महत्येची नोंद करण्यात आली. घटनांचा नेमका क्रम आणि आत्महत्येमागील नेमके कारणे जाणून घेण्यासाठी पोलीस सर्व बाजू तपासत आहेत, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.