डहाणूतील शिक्षकाने केला लिंगाणा किल्ला सर; पहिल्याच प्रयत्नात यश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2021 12:37 AM2021-02-11T00:37:57+5:302021-02-11T00:38:03+5:30

धाडसाची दखल महाराष्ट्र राज्य शिक्षक सेना डहाणू  यांनी घेऊन त्यांना सन्मानित केले.

The teacher from Dahanu built Lingana fort Sir | डहाणूतील शिक्षकाने केला लिंगाणा किल्ला सर; पहिल्याच प्रयत्नात यश

डहाणूतील शिक्षकाने केला लिंगाणा किल्ला सर; पहिल्याच प्रयत्नात यश

googlenewsNext

बोर्डी : डहाणू पंचायत समितीअंतर्गत साखरे कोठारपाडा प्राथमिक शाळेतील शिक्षक शांताराम गायकर यांनी कोणत्याही सुरक्षा साहित्याविना लिंगाणा किल्ला पहिल्याच प्रयत्नात सर केला आहे. हा पराक्रम करणारे ते राज्यातील पहिले शिक्षक ठरले आहेत. त्यांच्या या धाडसाची दखल महाराष्ट्र राज्य शिक्षक सेना डहाणू  यांनी घेऊन त्यांना सन्मानित केले.

महाराष्ट्रातील दुर्गप्रेमींच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू असलेला लिंगाणा किल्ला सर करणे हे आव्हान आहे. रायगड आणि तोरणा या दोन किल्ल्यांच्या मधोमध आकाशाला गवसणी घालणारा हा सुळका लिंगाणा किल्ला आहे. त्याची उंची समुद्रसपाटीपासून सुमारे ३१०० फूट आहे. हा किल्ला संरक्षक साहित्याच्या तसेच तज्ज्ञ मार्गदर्शकांच्या मदतीने अनेकांनी आजपर्यंत  सर केलेला आहे. पण, कुठल्याही प्रकारच्या संरक्षक साहित्याशिवाय लिंगाणा सर करण्याची कामगिरी शांताराम गायकर यांनी केली.  केवळ तीनच गिर्यारोहकांनी मोहीम फत्ते केली आहे.  पहिल्यांदाच लिंगाण्याला भेट देऊन ही यशस्वी चढाई करणारे गायकर पहिलेच दुर्गप्रेमी आहेत.      शिक्षक म्हणून इतिहासाची आवड जपणारे गायकर यांनी आजपर्यंत कळसूबाई शिखर, आलंग मदन कुलंग, हरिहर गड, कलावंतीण दुर्ग, भैरव गड, अतिदुर्गम वासोटा, जीवधन, हरिश्चंद्र गड, रतनगड, ढाक बहिरी आदी गडांवर चढाई केली आहे. अध्यापनासह छंद जोपासताना उत्कृष्ट कामगिरी केल्याचे गौरवोद्गार डहाणू पंचायत समितीचे गटविकास अधिकारी बी. एच. भरक्षे, गटशिक्षणाधिकारी राठोड, उपसभापती पिंटू गहला  यांनी काढले. त्यांच्या या किल्ल्यांप्रतीचे ज्ञान तसेच अनुभवाचा फायदा अध्यापनावेळी होऊन विद्यार्थ्यांमध्ये इतिहासाविषयी आवड निर्माण  होणार आहे. शिक्षक सेना जिल्हा कार्यकारिणी पदाधिकारी जयदीप पाटील, भूषण ठाकूर, एजाज शेख, डहाणू तालुका शिक्षकसेना अध्यक्ष विठ्ठल ठाणगे, प्रभाकर जंगम, रवी जाधव आदी शिक्षक सत्कारावेळी उपस्थित होते. 

लिंगाणा किल्ला सर करणे ही अभिमानास्पद बाब असून या यशस्वी मोहिमेसाठी साताऱ्याचे स्वप्निल चव्हाण, अकलूजचे शंकर शिंदे, भटकंती ग्रुप आणि वाणगाव ट्रेकर्स ग्रुपचे मार्गदर्शन लाभले. त्यामुळेच ही अवघड कामगिरी सोपी झाली. 
- शांताराम गायकर, गिर्यारोहक

संरक्षक साहित्याविना शांताराम गायकर यांनी यशस्वी चढाई केल्याचे प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहिले. त्यांच्या धाडसाची दाद दिली पाहिजे. असा पराक्रम करणारे ते दुसरे गिर्यारोहक आहेत.
- शिवाजी पोटे, अध्यक्ष, 
लिंगाणा सुरक्षा समिती

Web Title: The teacher from Dahanu built Lingana fort Sir

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.