टीडीआरवरून शिवसेना-भाजपात जुंपली

By admin | Published: March 23, 2017 01:24 AM2017-03-23T01:24:44+5:302017-03-23T01:24:44+5:30

टीडीआर घोटाळ्यात जी बदलापूर पालिका अडचणीत सापडली, त्याच पालिकेत पुन्हा टीडीआरच्या माध्यमातून शहरातील

TDP gets involved in Shiv Sena-BJP | टीडीआरवरून शिवसेना-भाजपात जुंपली

टीडीआरवरून शिवसेना-भाजपात जुंपली

Next

बदलापूर : टीडीआर घोटाळ्यात जी बदलापूर पालिका अडचणीत सापडली, त्याच पालिकेत पुन्हा टीडीआरच्या माध्यमातून शहरातील रस्ता विकसित करण्याच्या विषयाला मंजुरी घेण्यात येणार होती. मात्र, या विषयाला भाजपाने विरोध केला. त्यामुळे सभागृहात भाजपा आणि शिवसेना यांच्यात चांगलीच जुंपली. अखेर, भाजपाने या विषयाला विरोध केल्यावर शिवसेनेने भाजपाचा विरोध डावलून हा विषय मंजूर केला.
बदलापूर नगरपालिकेची सर्वसाधारण सभा बुधवारी झाली. या सभेत शहरातील अनेक विकासकामांचे मुद्दे हाती घेतले होते. मात्र, त्यातील एक महत्त्वाचा विषय सभागृहात चर्चेला आला. बदलापूर येथील ज्युवेलीमधील विकास आराखड्यातील नव्या रस्त्याचे बांधकाम टीडीआरच्या माध्यमातून करण्याचा विषय मंजुरीसाठी आला. हा रस्ता बनवताना सरकारच्या निर्देशांचे पालन करून योग्य त्या निविदा प्रक्रियेतूनच रस्त्याचा विकास करण्यास शिवसेना तयार होती. मात्र, गेल्यावेळी टीडीआरमुळे अनेकजण अडचणीत आले. यामुळे टीडीआरचा विषय चुकीच्या पद्धतीने घेऊ नका, अशी भूमिका भाजपाने घेतली. यावेळी नगराध्यक्ष वामन म्हात्रे यांनीटीडीआरच्या माध्यमातून रस्ता कशा पद्धतीने विकसित केला जाईल, याचा खुलासा सभागृहात केला. तसेच सहायक नगररचनाकार सुदर्शन तोडणकर यांनीही या रस्त्याचे काम नियमानुसारच केले जाईल, असे स्पष्ट केले. मात्र, भाजपाचे गटनेते राजेंद्र घोरपडे यांनी मात्र टीडीआरच्या माध्यमातून जो विषय मंजुरीसाठी आणला आहे, तो चुकीचा असून या विषयासोबत प्रशासनाची टिप्पणी आणि एडीटीपी विभागाचा अभिप्राय सोबत जोडणे गरजेचे होते, असे स्पष्ट केले.
अभिप्राय नसताना परस्पर या विषयाला आम्ही मंजुरी देणार नाही, अशी भूमिका घोरपडे यांनी घेतली. यावरून म्हात्रे आणि घोरपडे यांच्यात जुंपली. अखेर, भाजपाने या विषयाला विरोध करत नियमानुसार हा विषय आल्यावर आम्ही मंजुरी देऊ, असे सांगितले. शिवसेनेने हा विषय नियमानुसार असून त्याला आमची मंजुरी असल्याचे स्पष्ट केले. (प्रतिनिधी)

Web Title: TDP gets involved in Shiv Sena-BJP

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.