ठाणे : राजस्थान येथील जयपूरमध्ये झालेल्या आॅल इंडिया शास्त्रीय एकल नृत्य स्पर्धेत ठाण्याच्या तनुश्री दिवाणला सुवर्णपदक मिळाले असून ठाणेकरांसाठी ही अभिमानाची बाब ठरली आहे.आॅल इंडिया आर्ट अॅण्ड कल्चर सोसायटी आणि राजस्थानी विकास महामंडळाच्या वतीने आयोजित ही स्पर्धा जयपूरमधील महाराणा प्रताप आॅडिटोरिअम येथे पार पडली. दोन दिवस चाललेल्या या राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धेत २० राज्यांतील विविध वयोगटांतील सुमारे ५०० हून अधिक स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. या स्पर्धेत ठाण्याच्या तनुश्रीने पंडित जसराज यांचे कस्तुरी तिलकम या गाण्यावर भरतनाट्यम सादर केले. उपस्थित प्रेक्षकांनी टाळ्यांच्या कडकडाटात दाद दिली. या स्पर्धेत तनुश्री ही प्रथम क्रमांकाची मानकरी ठरली असून तिला सुवर्णपदक देऊन सन्मानित केले.परीक्षक म्हणून उत्तर प्रदेशच्या पूनम सरस्वती, पुण्याचे प्रमोद नलावडे आणि डान्स इंडिया डान्समधील करण अरोरा यांनी काम पाहिले.
तनुश्रीने कमावले सुवर्णपदक
By admin | Updated: November 17, 2016 06:59 IST