गणेशोत्सवाच्या परवानग्या वेळेत घ्या; केडीएमसीकडून मंडळांना आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Published: August 2, 2019 11:10 AM2019-08-02T11:10:59+5:302019-08-02T11:11:20+5:30

गणेशोत्‍सवा निमित्‍त तात्‍पुरत्‍या स्‍वरुपात उभारणेचे मंडप, स्‍टेज,कमानी उभारण्‍याबाबत गणेश मंडळांना दिल्‍या जाणा-या परवानग्‍या २६ ऑगस्‍ट, २०१९ पर्यंत दिल्‍या जातील. 

Take time for Ganeshotsav permissions; Appeal to the Ganpati Mandal from KDMC | गणेशोत्सवाच्या परवानग्या वेळेत घ्या; केडीएमसीकडून मंडळांना आवाहन

गणेशोत्सवाच्या परवानग्या वेळेत घ्या; केडीएमसीकडून मंडळांना आवाहन

Next

डोंबिवली - गणेशोत्‍सवाच्‍या पूर्वतयारीकरिता महापालिका आयुक्‍त गोविंद बोडके यांनी त्‍यांचे दालनात महापालिका क्षेत्रातील गणेश मंडळे व पोलीस ठाण्‍याचे वरिष्‍ठ पोलीस निरिक्षक तसेच वाहतूक शाखेचे अधिकारी यांची संयुक्‍त बैठक नुकतीच आयोजित केली होती. सदर बैठकीत गणेशोत्‍सवासाठी लागणा-या परवानग्‍या विहित वेळेत घ्‍याव्‍यात असे महापालिकेतर्फे स्‍पष्‍ट करण्‍यात आले.

गणेशोत्‍सवा निमित्‍त तात्‍पुरत्‍या स्‍वरुपात उभारणेचे मंडप, स्‍टेज,कमानी उभारण्‍याबाबत गणेश मंडळांना दिल्‍या जाणा-या परवानग्‍या २६ ऑगस्‍ट, २०१९ पर्यंत दिल्‍या जातील. २६ ऑगस्‍ट नंतर कोणत्‍याही गणेश मंडळास महापालिकेच्‍या वतीने परवानगी दिली जाणार नाही, असे सदर बैठकीमध्‍ये अनधिकृत बांधकाम नियंत्रण विभागाचे सहा. आयुक्‍त सुहास गुप्‍ते यांनी स्‍पष्‍ट केले. सोसायटीच्‍या आवारात उभारल्‍या जाणा-या तसेच खाजगी मालमत्‍तेतील गणेश मंडळाच्‍या मंडपांना महापालिकेची परवानगी घेण्‍याची आवश्‍यकता नाही, तथापी अग्निशमन विभागाच्‍या व पोलीस परवानगी साठी अर्ज करणे बंधनकारक राहील, हे ही या बैठकीत स्‍पष्‍ट करण्‍यात आले.दाखल अर्ज अग्निशमन विभाग, संबंधित पोलिस स्‍थानक वाहतूक शाखा आणि प्रभागक्षेत्र अधिकारी यांच्‍या कार्यालयात पाठविले जाणार असून, या विभागाच्‍या ना-हरकत दाखल्‍याअंती प्रभागक्षेत्र कार्यालयामार्फत गणेश मंडळांना परवानगी दिली जाणार आहे. उत्‍सव किंवा कार्यक्रमास, मंडप, स्‍टेज व कमानी उभारण्‍याकरिता महापालिकेने सविस्‍तर कार्यपध्‍दती (SOP) निश्चित केली असून गणेश मंडळांनी उत्‍सव दिनांकाचे ३ आठवडयापूर्वी अर्ज सादर करणे आवश्‍यक राहील. सादर केलेले अर्ज संबंधित अभिकरणाकडे पाठविण्‍यात येवून प्रभागक्षेत्र अधिकारी यांच्‍यामार्फत परवानगी प्रदान केली जाणार आहे. महापालिकेने दिलेली परवानगी मंडपाच्‍या दर्शनी भागावर मंडळांनी लावणे बंधनकारक राहील.

तात्‍पुरत्‍या स्‍वरुपात उभारण्‍यात येणा-या मंडप, स्‍टेज, कमानीकरिता प्रती चौ. फुट रु.१५ (अक्षरी रुपये पंधरा मात्र) प्रमाणे शुल्‍क आकारण्‍यात येईल. सदर शुल्‍क परवानगी देण्‍यापूर्वी संबंधित संस्‍था/व्‍यक्ति यांनी भरणे बंधनकारक असेल. मंडप घातलेल्‍या ठिकाणी रस्‍ता खोदून खड्डा केल्‍याचे आढळल्‍यास त्‍यासाठी दंड म्‍हणून १०,००० रुपये संबंधितांकडून वसुल करण्‍यात येतील. तसेच संबंधित संस्‍था वा व्‍यक्तिविरुध्‍द कायदेशीर कारवाईही करण्‍यात येईल. सदर मंडपाच्‍या आत व बाहेर जाहिराती उभारल्‍याचे किंवा लावल्‍याचे आढळल्‍यास महापालिकेच्‍या जाहिरात धोरणाप्रमाणे आवश्‍यक ती फी भरणे संबंधित मंडळास बंधनकारक राहील.

उच्‍च न्‍यायालयाने दिलेल्‍या निर्देशानुसार मंडपामुळे रहदारीस अडथळा येणार नाही, याची दक्षता गणेश मंडळांनी घ्‍यावयाची आहे.मंडप परवानगीत दिलेल्‍या क्षेत्रफळापेक्षा जास्‍त आकारमानाचे मंडप उभारणी केल्‍यास त्‍यावर कारवाई करण्‍याच्‍या दृष्‍टीने ४ भरारी पथक गठीत केली जाणार असून सदर भरारी पथकं मंडपांची तपासणी करणार आहेत. मे. न्‍यायालयाने दिलेल्‍या निर्देशांचे उल्‍लंघन केल्‍याचे आढळल्‍यास संबंधित मंडळांवर गुन्‍हे दाखल केले जातील,त्‍याचप्रमाणे अधिक माहितीकरीता अनधिकृत बांधकाम नियंत्रण विभागाचे सहा. आयुक्‍त सुहास गुप्‍त यांचेशी संपर्क साधावा.असेही महानगरपालिका प्रशासनातर्फे स्‍पष्‍ट करण्‍यात आले.

Web Title: Take time for Ganeshotsav permissions; Appeal to the Ganpati Mandal from KDMC

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.