लोकमत न्यूज नेटवर्क
उल्हासनगर : गेल्या लॉकडाऊनमुळे अनेक व्यापारी देशोधडीला तर हजारो कामगार बेकार होऊन स्थलांतरित झाले. सरकारने पुन्हा लॉकडाऊन लागू केल्यास व्यापाऱ्यांसह कामगारांवर उपासमारीची वेळ येणार असून लॉकडाऊन ऐवजी कडक निर्बंध लागू करा. तसेच निर्बंध पायदळी तुडविणाऱ्यांवर दंडात्मक करवाईसह एफआरआय दाखल करण्याची सूचना व्यापारी संघटनेचे दीपक छतलानी यांनी केली.
शहरातील जीन्स मार्केट, जपानी व गजानन कपडा मार्केट, इलेक्ट्रॉनिक व इलेक्ट्रिकल मार्केट, गाऊन मार्केट, बॅग मार्केट, फर्निचर मार्केट, प्रेस बाजार मार्केट प्रसिद्ध आहे. राज्य व देशातून नागरिक खरेदीसाठी शहरात येतात. मात्र गेल्यावर्षीच्या लॉकडाऊनमुळे व्यापारी हैराण होऊन शेकडो व्यापारी देशोधडीला लागले. तर हजारो कामगारांनी शहरातून स्थलांतर केले. देशात कोरोना रुग्णांची संख्या कमी झाल्यावर सरकारने लॉकडाऊन शिथिल केले. त्यामुळे पुन्हा मार्केटमध्ये चैतन्य आले. व्यवसाय सुरळीत सुरु असताना, पुन्हा कोरोनाने डोके वर काढले आहे. गेल्यावर्षी पेक्षा जास्त कोरोना रुग्ण आढळत असल्याने, लॉकडाऊनची शक्यता व्यक्त होत असल्याने, व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे व काळजीचे वातावरण निर्माण झाले.
शहरातील युटीआय व्यापारी संघटनेमध्ये शहरातील लहानमोठ्या ४५ वेगवेगळ्या मार्केटच्या संघटना एकवटल्या आहेत. संघटनेचे कार्याध्यक्ष छतलानी यांनी व्यापाऱ्यांचा लॉकडाऊनला विरोध असल्याचे सांगितले. लॉकडाऊनमध्ये व्यापारी देशोधडीला लागून दुकानातील लाखो रुपयांचे साहित्य खराब झाल्याचे सांगितले. केंद्र व राज्य सरकारने इतरांप्रमाणे व्यापाऱ्यांना कोणतीही मदत दिली नाही. तसेच लॉकडाऊन काळातील वीज बिल माफ केले नाही. तसेच दुकानात काम करणाऱ्या कामगारांना माणुसकीच्या नात्यातून कामाविना कित्येक महिने पगार द्यावा लागल्याची माहिती छतलानी यांनी दिली. सरकारने लॉकडाऊन ऐवजी कडक निर्बंध जाहीर करून निर्बंधांचे उल्लंघन करणाऱ्यांवर सक्त कारवाई करून गुन्हे दाखल करावे, अशी सूचना छतलानी यांनी केली.
शहरातील फर्निचर मार्केट प्रसिद्ध असून राज्यभर येथील फर्निचरला मोठी मागणी आहे. गेल्यावर्षीच्या लॉकडाऊन काळात लाखो रुपयांचे फर्निचर दुकानात पडून राहिल्याने खराब झाले. तसेच त्या फर्निचरला मागणी नसल्याने अनेक व्यापारी कर्जबाजारी झाले. इतरांप्रमाणे व्यापाऱ्यांसाठी सरकारने मदतीचा हात पुढे करावा तरच व्यापाऱ्यांसह दुकानात काम करणारे हजारो कामगार आनंदी जगणार आहे.
- मदन कारिया, कार्याध्यक्ष, फर्निचर मार्केट संघटना
-----------------
शहरात जपानी व गजानन मार्केट कपड्यांसाठी प्रसिद्ध आहे. गेल्यावर्षीच्या लॉकडाऊनमुळे अनेक व्यापाऱ्यांवर उपासमारीची वेळ आली. दुकानात काम करणारे शेकडो कामगार गावी गेल्याने, त्यातील अनेक जण अद्याप परत आलेले नाही. दरम्यान कोरोनाचे रुग्ण वाढल्याने लॉकडाऊनची भीती व्यापाऱ्यांत निर्माण झाली असून व्यापाऱ्यांचा लॉकडाऊनला विरोध आहे.
- हेमंत कटारिया, अध्यक्ष, कपडे व्यापारी संघटना