अंबरनाथ : भास्करनगर परिसरात राहणाऱ्या बाबू शेख (५०) यांनी आपल्या सुनेने चारित्र्यावर संशय व्यक्त केल्याने आपल्या राहत्या घरी आत्महत्या केली. शेख यांनी आपण निरपराध असून आपल्यावरील या गलिच्छ आरोपांमुळे व्यथित झाल्याने जीव देत असल्याच्या भावना आत्महत्येपूर्वी मोबाइलमध्ये चित्रित केल्याचे सूत्रांनी सांगितले.याबाबत सून, तिचा भाऊ आणि वडील अशा तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भास्करनगर मारीदेवी मंदिराजवळ राहणारे शेख यांची सून हीना, तिचे वडील कासम शेख आणि भाऊ अब्दुल कासम शेख या तिघांनी बाबू शेख यांना मानसिक त्रास दिला होता. हीनावर बाबू शेख यांची वाईट नजर असल्याचा आरोप केला होता. त्यावरून, त्यांच्यात वाद झाले होते. हीनाचे आरोप बिनबुडाचे असल्याचे सांगण्याचा बाबू शेख यांनी वारंवार प्रयत्न केला. मात्र, ते तिघेही आरोपावर ठाम राहिल्याने हताश झालेल्या बाबू शेख यांनी २३ डिसेंबरला सायंकाळी ५.४५ च्या सुमारास आत्महत्या केली. तत्पूर्वी त्यांनी मोबाइलमध्ये आपण निरपराध असून आपण आपली सून हीना हिच्याकडे वाईट नजरेने पाहिलेले नाही, अशी कबुली रेकॉर्ड केली. या रेकॉर्डिंगचा आधार घेत बाबू यांचा मुलगा अब्दुल बाबू शेख याने अंबरनाथ पोलीस ठाण्यात त्या तिघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. वहिनीच्या खोट्या तक्रारीमुळे आपल्या वडिलांना जीव गमवावा लागल्याचे मुलगा अब्दुल याने तक्रारीत स्पष्ट केले आहे. (प्रतिनिधी)
सुनेकडून चारित्र्याचा संशय; सासऱ्याची आत्महत्या
By admin | Updated: December 26, 2016 06:39 IST