लोकमत न्यूज नेटवर्क भार्इंदर : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (सीबीएसई) रविवारी ‘नीट’ (एनईईटी) परीक्षा घेतली. त्यात, परीक्षार्थ्यांना बुटांखेरीज चप्पल घालून परीक्षेला बसण्याची अट सीबीएसईने घातली होती. मात्र, मीरा रोड येथील सेव्हन स्क्वेअर अकादमी परीक्षा केंद्रात मात्र परीक्षार्थ्यांना बुटांसह सर्व प्रकारच्या चप्पल घालून परीक्षेला बसण्यास मनाई केली. यामुळे परीक्षार्थ्यांना अनवाणी उभे राहावे लागल्याने पायाला चटके बसत होते. या प्रकाराने पालकांनी चीड व्यक्त केली. मीरा-भार्इंदरमधील सेव्हन स्क्वेअर अकादमी या केंद्रात जिल्ह्याच्या विविध भागांतून सुमारे ६०० परीक्षार्थी पालकांसह सकाळी ६पासून हजर होते. उन्हाचा पारा चढताच पालकांनी परीक्षार्थ्यांना शाळेत प्रवेश देण्याची विनंती शाळेकडे केल्यानंतरही त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. यामुळे संतप्त झालेल्या पालकांनी शाळेला जाब विचारल्यानंतर पोलिसांच्या मध्यस्थीने परीक्षार्थ्यांना शाळेत प्रवेश देण्यात आला. मुलांचा उन्हापासून बचाव करण्यासाठी कोणतीही सोय केली नव्हती. सुमारे तासभर उन्हातच उभे करण्यात आले. सीबीएसईच्या निर्देशांनुसार परीक्षार्थ्यांना पायांत बूट घालून तसेच इतर वर्जित साहित्यांसह परीक्षेला बसण्यास मनाई केली होती. परंतु, स्लिपर्स व कमी उंचीच्या सॅण्डल्स घालून परीक्षेला बसू देण्यास अनुमती देण्यात आली होती. शाळेने मात्र सर्वच परीक्षार्थ्यांना बुटांसह सर्व प्रकारच्या चपला घालून परीक्षेला बसण्यास मनाई करीत त्या शाळेच्या प्रवेशद्वाराजवळच काढून ठेवण्यास सांगितले. परंतु, स्लिपर्स घालून आलेल्या काही परीक्षार्थ्यांना मात्र परवानगी देण्यात आली. तसेच मुलींनी सोबत आणलेल्या हेअर पिन, हेअर बॅण्डसह इतर वस्तूही प्रवेशद्वाराजवळच काढून ठेवण्यास बजावले. चपला काढून ठेवल्याने परीक्षार्थ्यांनी अनवाणी परीक्षा दिली. परीक्षा संपल्यानंतर उन्हाचा चटका सहन न झाल्याने ते पळत सुटले व सावलीच्या आडोशाखाली चपला घातल्या. शाळेच्या या बेजबाबदार वृत्तीमुळे पालकांनी संताप व्यक्त करत सीबीएसईच्या निर्देशानुसार केवळ बुटांना परवानगी नसताना सर्वच मुलांच्या चपलांना परवानगी का नाकारण्यात आली, अशी विचारणा केली. याबाबत, शाळेतील सुरक्षारक्षकांना विचारले असता त्यांनी सीबीएसईच्या निर्देशांकडे बोट दाखवून अधिक सांगण्यास नकार दिला. कडाक्याच्या उन्हात अशी अट टाकणे अन्यायकारक होते. याऐवजी परीक्षार्थ्यांकडील वस्तूंची तपासणी करून त्यांना प्रवेश देणे इष्ट होते. - मीना निर्मळे, पालक, घणसोलीपरीक्षार्थ्यांवर लक्ष ठेवण्यासाठी नियंत्रकांसह केंद्रात ठिकठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले असतानाही सरसकट सर्वच परीक्षार्थ्यांना बुटांखेरीज चपला काढण्याचे निर्देश देणे अरेरावीचेच होते. - राजेश नायकोडे, पालक, वाशी
‘नीट’च्या विद्यार्थ्यांना उन्हाचे चटके
By admin | Updated: May 8, 2017 06:03 IST