वसई : विरारजवळील कुंभारपाडा येथे अनधिकृत बांधकाम पाडण्याचे काम करणाऱ्या वसई विरार महापालिकेच्या पथकाला तीव्र विरोध करण्यात आला. आगरी सेनेच्या कार्यकर्त्यांनी कार्यालयात आत्महत्येचा प्रयत्न करून पथकाला कारवाई न करताच परत पाठविले. विरार शहरापासून सहा किलोमीटर अंतरावर असलेल्या कुंभारपाड्यात शनिवारी संध्याकाळी आत्महत्येचे थरारनाट्य घडले. कुंभारपाडा परिसरातील अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्यासाठी महापालिकेचे पथक गेले होते. याठिकाणी शेकडो बेकायदा चाळी बांधण्यात आल्या आहेत. त्यावर महापालिकेने बुलडोझर फिरवण्यास सुरुवात केली आहे. मात्र, येथील एका अनधिकृत चाळीत आगरी सेनेचे कार्यालय तोडण्याची कारवाई सुुरु झाली असताना कार्यकर्त्यांनी हंगामा केला.कार्यकर्त्यांनी महापालिकेच्या पथकाला अडवून धरले. त्यानंतर बुलडोझरवर दगडफेक करून तो तोडण्यात आला. इतकेच नाही तर एक महिला आणि पुरुष कार्यकर्त्याने चक्क कार्यालयात दोरी बांधून गळफास लावून घेण्याची धमकी दिली. दोन्ही दोरीत गळफास अडकवून उभे असल्याने यापरिसरात वातावरण तंग झाले होते. कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पथकाने आगरी सेनेचे कार्यालय न तोडता माघारी फिरण्याचा निर्णय घेतला. (प्रतिनिधी)
बांधकामे वाचवण्यासाठी केला आत्महत्येचा स्टंट
By admin | Updated: February 6, 2017 04:19 IST