‘घरातच बसा’चे ठाण्यात तुणतुणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 2, 2020 12:13 AM2020-06-02T00:13:30+5:302020-06-02T00:13:53+5:30

प्रशासनाचे रडगाणे : चारपेक्षा जास्त लोक जमण्यास बंदी, जिल्ह्यातील प्रवासासाठी ई-पास

‘Stay at home’ in Thane | ‘घरातच बसा’चे ठाण्यात तुणतुणे

‘घरातच बसा’चे ठाण्यात तुणतुणे

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : राज्यात येत्या ५ आणि ८ जूनपासून कंटेनमेंट झोन वगळता अनेक ठिकाणी संचारबंदीमध्ये शिथिलता आणण्याची घोषणा सरकारने केली असताना ठाणे जिल्ह्यात चारपेक्षा जास्त व्यक्तींना एकत्र येण्यास बंदी करणारे मनाई आदेश लागू केले आहेत. अमेरिका तसेच युरोपमधील अनेक देशांत कोरोनाचे रुग्ण ठाणे जिल्ह्यापेक्षा जास्त असतानाही तेथील दैनंदिन जीवन सुरळीत करण्यात आले असताना ठाणे जिल्ह्यातील प्रशासन निर्बंध अधिक घट्ट करण्यात धन्यता मानत असल्याने ठाणेकरांमध्ये तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. आंतरराज्य प्रवासाला पोलिसांच्या ई-पासशिवाय परवानगी नाही, हे सर्वश्रुत आहे. मात्र, आंतरजिल्हा प्रवाशांकरिताही ई-पासची सक्ती केली जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.


केंद्र शासनाने येत्या ८ जूनपासून अनेक व्यवहारांमध्ये शिथिलता आणण्याची घोषणा केली आहे. तसेच आजपासून आंतरजिल्हा प्रवासाला परवानगीची गरज नसल्याचे म्हटले आहे. शिवाय, संपूर्ण दिवसभराची संचारबंदीही शिथिल करून रात्री ९ ते पहाटे ५ पर्यंत संचारबंदी लागू केली आहे. असे असले तरी ठाणे जिल्ह्यातील काही दाट वस्तीच्या भागात कोरोना रुग्णांची संख्या वाढती असल्याचे कारण पुढे करून सरसकट ठाणे शहर पोलीस आयुक्तालय आणि ठाणे ग्रामीण भागात संचारबंदी तीव्र करण्याचा निर्णय घेतला आहे. ठाणे जिल्ह्यातील ज्या शहरांमधील ज्या भागात कोरोनाचे रुग्ण कमी आहेत, तेथील व्यवहार पूर्ववत सुरू करणे गरजेचे असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. केवळ अत्यावश्यक कामांसाठी म्हणजे किराणा, दूध वितरण, वैद्यकीय सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी संचारबंदी लागू राहणार नाही. याशिवाय, अत्यावश्यक कामांकरिता सकाळी ९ ते सायंकाळी ५ या वेळेत परवानगी राहणार आहे. मुख्य बाजारपेठ येत्या ५ जूननंतर सुरू होणार असून ती समविषम तारखेनुसार एक दिवसाआड रस्त्याच्या एकाच बाजूने सुरू राहणार आहे. १ ते ३० जून या कालावधीत हा मनाई आदेश लागू असल्यामुळे कोणत्याही प्रकारचा सार्वजनिक कार्यक्रम, सण, उत्सव, स्पर्धा, सामाजिक आणि राजकीय कार्यक्रमांना बंदी राहणार असल्याचे पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांनी आपल्या आदेशात म्हटले आहे.


खासगी आणि सार्वजनिक वाहतूक सेवा बंद राहणार असल्यामुळे आंतरराज्य, राज्यांतर्गत, जिल्हांतर्गत प्रवासी बसवाहतुकीस मनाई आहे. सर्व प्रकारच्या शैक्षणिक संस्थाही बंद राहतील. ३ जूनपासून सार्वजनिक उद्यानात व्यायाम, फिरणे, सायकलिंगला सकाळी ५ ते सायंकाळी ७ पर्यंत मुभा राहणार आहे.

केवळ अत्यावश्यक कामांसाठी १ ते ३० जून या काळात घराबाहेर पडण्यासाठी परवानगी राहणार आहे. ५ जूननंतर समविषम तारखेनुसार दुकाने बाजारपेठांमध्ये सुरू करता येतील. आंतरराज्य आणि जिल्हा प्रवासाला मात्र अजूनही पोलीस ई-पासशिवाय परवानगी दिलेली नाही.’’
- बाळासाहेब पाटील, पोलीस उपायुक्त, विशेष शाखा, ठाणे शहर पोलीस आयुक्तालय

अत्यावश्यक सेवांसाठी टॅक्सीचालक अधिक दोन, रिक्षामध्ये चालक अधिक दोन प्रवासी, चारचाकी वाहनांतूनही चालकासह तिघे, दुचाकीवर फक्त चालक यांना परवानगी दिल्याचे आदेशात म्हटले आहे.

Web Title: ‘Stay at home’ in Thane

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.