लोकमत न्यूज नेटवर्कउल्हासनगर : सत्ताधारी विकास आघाडीतील भाजपा, साई व ओमी टीममध्ये स्थायी समिती, विशेष व प्रभाग समिती सभापतीपदावरून रस्सीखेच सुरू झाली आहे. महापौर भाजपा, तर उपमहापौरपद साई पक्षाच्या वाट्याला गेले आहे. स्थायी समिती सभापतीपद साई पक्षातील बंडखोर गटाकडे गेले आहे. हाती काही न लागलेल्या ओमी टीमने ९ पैकी ६ विशेष समित्या व चारपैकी दोन प्रभाग समिती सभापतीपदांवर दावा सांगितला आहे.सभापतीच्या निवडणुका २० मे पूर्वी होण्याची शक्यता आहे. सत्तेत वाटा नसणाऱ्या ओमी टीमने बहुतेक विशेष व प्रभाग समित्या सभापतींपदावर दावा केला आहे. साई पक्षाचे प्रमुख जीवन इदनानी यांना उपमहापौरपद दिले असून त्या पक्षातील बंडखोर गटाला राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांनी स्थायी समिती सभापतीपदाचे गाजर दाखवले आहे. स्थायी सभापतीपदाचा शब्द राज्यमंत्री चव्हाण यांनी कांचन लुंड यांना दिल्याचे समजते. मात्र, स्पर्धेत कांचन यांच्यासह टोनी सिरवानी व कविता पंजाबीही आहेत. सहांवर ओमी टीमने, तर साई पक्षाने चार समित्यांवर दावा केला आहे. मराठी नगरसेवकांच्या पदरी निराशा?निष्ठावंत भाजपा गटाला एकाही विशेष समितीसह प्रभाग समिती सभापतीपद मिळत नसल्याने त्यांच्यातही नाराजी पसरली आहे. सत्तेच्या वाटाघाटीत भाजपातील मराठी नगरसेवकांना काय, असा प्रश्नही उपस्थित झाला आहे.
स्थायी सभापतीपदावरून उल्हासनगरमध्ये रस्सीखेच
By admin | Updated: May 8, 2017 05:58 IST