ठाणे : कौटुंबिक कारणावरून पती-पत्नीत वारंवार भांडणे होत असल्याने पत्नी माहेरी निघून गेली होती. तिची समजूत काढण्यासाठी गेलेल्या जावयालाच सासरा आणि दोन मेव्हण्यांनी मारहाण केल्याची घटना ठाण्यात घडली. याप्रकरणी सासऱ्यासह दोन मेव्हण्यांविरोधात गुन्हा दाखल केल्याची माहिती कळवा पोलिसांनी दिली.
तक्रारदार रिक्षाचालक असून त्यांचे २०२२ मध्ये लग्न झाले आहे. आईवडील, भाऊबहिणींसह ते एकत्र राहतात. त्यांच्यात आणि पत्नीत कौटुंबिक कारणावरून वारंवार भांडणे होत असतात. त्यांची पत्नी गेल्या आठवड्यात घर सोडून माहेरी राहण्यासाठी गेली होती. तिची समजूत काढण्यासाठी ११ सप्टेंबर २०२५ रोजी सकाळी साडेदहा वाजता ते सासरी गेले होते.
पती-पत्नीत बोलणे सुरू असतानाच, त्या ठिकाणी तक्रारदारांचे सासरे आणि दोन मेव्हणे आले. त्यांनी तू आमच्या घरात का आला असे बोलून शिवीगाळ करत मारहाण केली. त्यानंतर एका मेव्हण्याने किचनमध्ये ठेवलेले मोठे उलथणे तक्रारदारांच्या डोक्यात मारल्याने त्यांच्या डोक्याला दुखापत झाली. त्यांनी तत्काळ ११२ या हेल्पलाइन क्रमांकावर फोन करून पोलिसांना घटनेची माहिती दिली. त्यानंतर तक्रारदार नातेवाइकांसोबत पोलिसांत गेले. सासरा आणि मेव्हण्यांविरोधात तक्रार दिल्याने मारहाणीप्रकरणी गुन्हा दाखल केल्याची माहिती कळवा पोलिसांनी दिली.