ठाणे : शहरातील वाहतूककोंडी फोडण्यासाठी ठाणे शहर वाहतूक नियंत्रण शाखेने राष्ट्रीय महामार्ग क्रमांक-३ आणि राज्य महामार्ग क्रमांक-४२ वरील समांतर असलेल्या सर्व्हिस रोड एकमार्गी करण्याचा नवा फंडा डोळ्यांसमोर ठेवला आहे. याबाबत, वाहतूक शाखेने ठाणेकरांकडे लेखी स्वरूपात अभिप्राय मागून त्यानंतर त्याच्या अंमलबजावणीसाठी हालचाली सुरू केल्या आहेत. या मार्गावर एकेरी वाहतूकसुरू झाल्यास कोंडी काही प्रमाणात सुटेल, असा विश्वास वर्तवला आहे. तीनहातनाका, नितीन, कॅडबरी, माजिवडा, कापूरबावडी या महत्त्वाच्या जंक्शनसह घोडबंदर रोडवरील सिग्नलच्या ठिकाणी अनेक रस्ते येतात. त्यामुळे येथे वाहतुकीचे व्यवस्थापन क रण्यास अडचणी निर्माण होते. तसेच सिग्नल रोटेशनसाठी जास्त वेळ लागत असल्याने प्रत्येक मार्गिकेवर वाहनांची कोंडी होते. ही कोंडी सोडवण्यासाठी वाहतूक शाखेने आनंदनगर चेकनाका ते माजिवडा जंक्शन या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक-३ व माजिवडा जंक्शन ते ओवळा या राज्य महामार्ग क्रमांक-४२ वर समांतर असलेल्या सेवारस्त्यावरून सध्या सुरू असलेली द्विमार्गी वाहतूक एकेरी करण्याचा प्रस्ताव आहे. याबाबत, ठाणेकरांनी २८ जानेवारीपर्यंत वाहतूक कार्यालयात अभिप्राय मागवण्यात आल्याची माहिती उपायुक्त संदीप पालवे यांनी दिली. (प्रतिनिधी)
महामार्गावरील सर्व्हिस रोडवर एकेरी वाहतूक
By admin | Updated: January 25, 2017 04:54 IST