शिवसैनिकांनीच केली नगरसेवकाच्या कार्यालयाची तोडफोड;बदलापुरात शिवसेनेतील वाद चव्हाट्यावर

By ऑनलाइन लोकमत | Published: September 12, 2019 12:15 AM2019-09-12T00:15:43+5:302019-09-12T00:16:02+5:30

गुन्हा दाखल : आरोपींमध्ये शिवसेनेचे शहरप्रमुख वामन म्हात्रेंचाही समावेश,

Shiv Senais vandalized the office of the corporator | शिवसैनिकांनीच केली नगरसेवकाच्या कार्यालयाची तोडफोड;बदलापुरात शिवसेनेतील वाद चव्हाट्यावर

शिवसैनिकांनीच केली नगरसेवकाच्या कार्यालयाची तोडफोड;बदलापुरात शिवसेनेतील वाद चव्हाट्यावर

Next

बदलापूर : कुळगाव-बदलापूर नगर परिषदेच्या सर्वसाधारण सभेच्या आधी पालिकेत शिवसेनेचे नगरसेवक आणि पक्षाचे शहरप्रमुख यांच्यात शाब्दिक वाद झाला होता. या वादाचे पडसाद पालिकेची सभा संपल्यावर उमटले. शहरप्रमुखांसोबत वाद घातल्याचा राग मनात धरून काही शिवसैनिकांनी नगरसेवकाच्या कार्यालयावर हल्ला करून कार्यालयाची तोडफोड केली. याप्रकरणी आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शिवसेनेचे नगरसेवक शैलेश वडनेरे हे बुधवारी सर्वसाधारण सभेसाठी पालिकेत आले होते. यावेळी शहरप्रमुख वामन म्हात्रे आणि नगरसेवक तुकाराम म्हात्रे हेदेखील कार्यालयात होते. वडनेरे हे पालिकेत आल्यावर म्हात्रे यांच्यासोबत वादावादी झाली. यावेळी नगरसेवकांनी मध्यस्थी करून हे प्रकरण शांत केले. मात्र, या प्रकाराची माहिती मिळताच पालिका कार्यालयासमोर शिवसैनिकांची गर्दी झाली होती.

या घटनेमुळे पालिकेत तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते. दोन्ही बाजूंचे कार्यकर्ते पालिकेसमोर जमल्याने पोलिसांनी हस्तक्षेप करत दोन्ही गटांच्या कार्यकर्त्यांना पालिकेबाहेरून हुसकावून लावले. मात्र, सभा संपल्यावर काही शिवसैनिकांनी वडनेरे यांच्या कार्यालयावर हल्ला केला. तीन ते चार गाड्या भरून कार्यकर्ते आले आणि त्यांनी कार्यालयाची तोडफोड करून पोबारा केला. हा प्रकार घडला, त्यावेळी नगरसेवक वडनेरे हे शेजारीच गणेश मंडळाच्या मंडपात आरती करत होते. हा प्रकार अचानक घडल्याने त्यांना बचाव करता आला नाही. मात्र, हा प्रकार म्हात्रे यांच्या आदेशाने झाल्याचा आरोप वडनेरे यांनी केला आहे.

वडनेरे आणि म्हात्रे यांच्यात गेल्या वर्षभरापासून वाद होता. त्यातच आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने वडनेरे हे उमेदवारीच्या आशेवर प्रचार करत होते. त्यामुळे वडनेरे हे गेल्या काही दिवसांपासून प्रसिद्धीत होते. मात्र, ज्या पक्षातून ते इच्छुक होते, त्या पक्षाच्या शहराध्यक्षांबरोबरच त्यांचे पटत नसल्याने बदलापुरात वडनेरे यांनी स्वत:चा गट तयार करून काम सुरू केले होते. त्यातच म्हात्रे आणि वडनेरे यांचा वाद वाढल्याने त्याचे पर्यवसान तोडफोडीत झाले.

नगरसेवकाच्या कार्यालयाची तोडफोड झाल्यावर त्या ठिकाणी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. वातावरण चिघळणार नाही, याची दक्षता घेण्यात आली आहे. याप्रकरणी गुन्हा नोंदविण्यात आला आहे. संशयितांना ताब्यात घेऊन योग्य कार्यवाही केली जाईल. - विनायक नराळे, सहायक पोलीस आयुक्त

पालिकेत वाद झाल्यावर त्या ठिकाणी न थांबता मी माझ्या कार्यालयात आलो. बाजूलाच गणेश मंडळाच्या मंडपात आरती करत असताना, जमावाने हल्ला करून कार्यालयाची तोडफोड केली आहे. या हल्ल्यात नगरसेवक तुकाराम म्हात्रे यांचा हात आहे. - शैलेश वडनेरे, नगरसेवक

संतप्त शिवसैनिकांनी हा हल्ला केला आहे. मात्र, त्यामागे काही कारणे असतील. वडनेरे हे गेल्या काही दिवसांपासून मनसे आणि राष्ट्रवादीच्या जवळ होते. त्यामुळे त्यांच्याविषयी शिवसैनिकांमध्ये संताप होता. त्यातून हा प्रकार घडला आहे. त्यात प्रत्यक्ष माझा सहभाग नव्हता. - वामन म्हात्रे, शहराध्यक्ष, शिवसेना, बदलापूर

शैलेश वडनेरे यांच्या कार्यालयावर झालेल्या हल्लाप्रकरणी शिवसेना शहरप्रमुख वामन म्हात्रे यांच्यासह ९ जणांवर गुन्हा दाखल केला आहे. आरोपींमध्ये नगरसेवक तुकाराम म्हात्रे, केशव म्हात्रे, रोहिदास भंडारी, भावेश म्हात्रे, बंडू म्हात्रे, प्रसाद परब, बंटी म्हसकर, कांत्या, व इतर ७ ते ८ जणांचा समावेश आहे. वामन म्हात्रे यांनी हल्ल्यासाठी चिथावणी दिल्यामुळे त्यांच्याविरोधातही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: Shiv Senais vandalized the office of the corporator

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.