कल्याण: अनधिकृत बांधकामप्रकरणी शिवसेनेचे मल्लेश शेट्टी यांचे नगरसेवकपद रद्द केल्यामुळे सत्ताधारी शिवसेना भाजपामध्ये जुंपली आहे. भाजपासहीत अन्य पक्षातील काही नगरसेवकांविरोधात अनधिकृत बांधकामप्रकरणी तक्रार दाखल झाली असताना आमच्याच नगरसेवकावर कारवाई का, असा सवाल शिवसेनेने केला आहे. भाजपच्या दबावाखाली सूडबुध्दीने ही कारवाई झाल्याचा आरोप करणाऱ्या शिवसेनेने केवळ तोंडी टीकास्त्र न सोडता जाहीर पत्रक काढावे, असे आव्हान भाजपने दिले आहे.कार्यालयाचे अनधिकृत बांधकाम केल्याप्रकरणी नगरसेवक शेट्टी यांचे पद केडीएमसीचे आयुक्त ई. रवींद्रन यांनी बुधवारी रद्द केले. नोव्हेंबरमध्ये पार पडलेल्या निवडणुकीत विजयी झालेल्या काही उमेदवारांविरोधात पराभूत उमेदवारांनी तक्रारी दाखल केल्या आहेत. यात बहुतांश तक्रारी या अनधिकृत बांधकामाच्या आहेत. त्यात शिवसेना मनसेसह भाजपाच्या नगरसेवकांचाही समावेश आहे. वेगवेगळ््या पक्षाच्या सदस्याविरुद्ध तक्रारी असताना केवळ शिवसेनेच्या शेट्टींचे पद रद्द केल्याने शिवसेनेत असंतोष पसरला आहे. अन्य पक्षातील नगरसेवकांनाही आयुक्तांनी नोटीस बजावली असताना शेट्टी यांच्यावरच कारवाई का,असा सवाल शिवसेनेचे गटनेते रमेश जाधव यांनी केला. ही भाजपची खेळी असून त्यांच्या दबावाखाली आयुक्तांनी ही कारवाई केल्याचा आरोप शिवसेनेने मित्रपक्षावर केला. शिवसेनेच्या आरोपामुळे सत्ताधारी पक्षांमध्ये बेबनाव निर्माण झाला आहे. शिवसेनेने केवळ तोंडी आरोप करू नये यासंदर्भात जाहीर पत्रक काढावे, असे आव्हान भाजपचे कल्याण जिल्हाध्यक्ष तथा आमदार रवींद्र चव्हाण यांनी दिले. आयुक्त हे आयएएस दर्जाचे आहेत त्यामुळे ते कोणताही निर्णय राजकीय हेतूने घेणार नाहीत. शेट्टी यांच्या कार्यालयाबाबत राष्ट्रवादीचे माजी खासदार आनंद परांजपे यांनीसर्वप्रथम तक्रार केली होती. त्यावेळीच कारवाईचा निर्णय घेण्यात आला होता. त्यामुळे शिवसेनेच्या आरोपात तथ्य नसल्याचे चव्हाण यांनी स्पष्ट केले. (प्रतिनिधी)
आयुक्तांच्या कारवाईवरून शिवसेना भाजपात जुंपली
By admin | Updated: March 26, 2016 02:56 IST