शिवसेनेत इच्छुकांची गर्दी, स्वपक्षीयांमुळेच होणार कोंडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2019 12:30 AM2019-08-29T00:30:06+5:302019-08-29T00:30:16+5:30

विधानसभेसाठी सर्वांचीच मोर्चेबांधणी : सर्वच पक्षांमध्ये आगरी समाजाच्या इच्छुक उमेदवारांचा भरणा

In Shiv Sena, a crowd of aspirants will become the cause of problem | शिवसेनेत इच्छुकांची गर्दी, स्वपक्षीयांमुळेच होणार कोंडी

शिवसेनेत इच्छुकांची गर्दी, स्वपक्षीयांमुळेच होणार कोंडी

Next

मुरलीधर भवार ।
लोकमत न्यूज नेटवर्क
कल्याण : कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघात गेल्या पाच वर्षांत शिवसेनेचे आमदार सुभाष भोईर यांनी विविध कामे केली असली तरी, आगामी विधानसभा निवडणुकीत त्यांच्यासमोर स्वपक्षातीलच इच्छुकांचे तगडे आव्हान उभे ठाकले आहे. त्यामुळे विद्यमान आमदाराला पुन्हा संधी द्यायची की, इच्छुकांपैकी एकाला संधी द्यायची, असा पेच पक्षश्रेष्ठींपुढे उभा ठाकला आहे.


२०१४ च्या लोकसभा निवडणुकीत डॉ. श्रीकांत शिंदे यांना कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघातून चांगले मताधिक्य मिळाले होते. अलीकडच्या लोकसभा निवडणुकीतही त्यांना चांगली मते मिळाली. २००९ साली या मतदारसंघातून शिवसेनेचे रमेश म्हात्रे यांनी निवडणूक लढविली होती. त्यावेळी मनसेची लाट होती. त्यामुळे म्हात्रे यांचा चार हजार ६०० मतांच्या फरकाने पराभव झाला होता. पराभवानंतरही म्हात्रे यांनी या मतदारसंघात काम सुरू ठेवले. मात्र, २०१४ मध्ये पक्षाने त्यांना उमेदवारी दिली नाही. भोईर यांना उमेदवारी दिली. त्यावेळी म्हात्रे यांनी भाजपतर्फे निवडणूक लढविण्याचा प्रयत्न केला होता. त्यावेळी पक्षप्रमुखांनी त्यांना कुठेही जाऊ नका, भविष्यात नक्की न्याय देऊ, असे आश्वासित केले होते. आता म्हात्रे हे प्रबळ दावेदार आहेत. म्हात्रेंसोबतच महापालिकेतील स्थायी समिती सभापती दीपेश म्हात्रे हेदेखील इच्छुक आहेत. त्यांना डोंबिवली मतदारसंघातूनही उमेदवारी हवी आहे. दीपेश यांना २०१४ मध्ये डोंबिवली मतदारसंघातून उमेदवारी मिळाली होती. त्यामुळे त्यांचा विचार डोंबिवलीकरिता पुन्हा होईल का, याविषयी साशंकता आहे. मात्र, त्यांनी कल्याण ग्रामीणमधून उभे राहण्याचा मानस व्यक्त केल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. शिवसेना, भाजपची युती झाली नाही, तर दीपेश यांच्याकडून वेगळा विचार केला जाऊ शकतो. त्यांना भाजपची आॅफर मिळू शकते. मात्र, भाजपचे राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांना ते प्रतिस्पर्धी मानत असल्याने ते दीपेश यांना भाजपमध्ये घेतील की नाही, हा प्रश्नच आहे. दीपेश यांच्याप्रमाणेच शिवसेनेचे डोंबिवली शहरप्रमुख व नगरसेवक राजेश मोरे आणि ज्येष्ठ शिवसैनिक एकनाथ पाटील यांच्यासह ठाण्याचे उपमहापौर रमाकांत मढवी यांच्याही नावाची चर्चा सुरू आहे. शिवसेनेच्या इच्छुकांची यादी पाहता आमदार भोईर यांच्यापुढे स्वपक्षीयांचेच आव्हान मोठे आहे.


राष्ट्रवादीकडून लोकसभा निवडणुकीत पराभूत झालेले बाबाजी पाटील हे कल्याण ग्रामीणमधून इच्छुक आहेत. आगरी युथ फोरम व सर्वपक्षीय संघर्ष समितीचे गुलाब वझे हे राष्ट्रवादीचे ज्येष्ठ पदाधिकारी आहेत. त्यांच्याही नावाची चर्चा असून ते कल्याण ग्रामीणमधून इच्छुक आहेत. त्याचबरोबर राष्ट्रवादीतून युवा नेते सुधीर वंडार पाटील यांच्याही नावाची चर्चा आहे.
मनसेतर्फे २००९ साली रमेश पाटील यांनी निवडणूक लढवली होती. कल्याण ग्रामीणमधून ते निवडून आले होते. २०१४ साली त्यांचा पराभव झाला. त्यानंतर ते भाजपमध्ये गेले. त्यापश्चात ते काँग्रेसमध्ये गेले. मूळचे ते काँग्रेसी होते. प्रकृती ठीक नसल्याने ते यावेळी इच्छुक नाहीत. मनसेकडून २०१४ साली राजू पाटील यांनी लोकसभा निवडणूक लढवली होती. त्यावेळी त्यांचा पराभव झाला होता. २०१९ सालच्या निवडणुकीत त्यांनी पुन्हा लोकसभेचा आग्रह केला होता. मात्र, पक्षाने निवडणूक न लढवण्याचा इरादा जाहीर केल्याने पाटील यांच्या मनसुब्यांवर पाणी फेरले गेले. आताही विधानसभेला त्यांनी रिंगणात उतरावे, अशी मनसे कार्यकर्त्यांची इच्छा आहे. मात्र, पाटील यांचे अद्याप तळ्यातमळ्यात आहे. पक्षाचा आदेश आल्याशिवाय ते त्यांचा मनसुबा जाहीर करणार नाहीत. असे असले तरी त्यांच्या नावाची जोरदार चर्चा आहे. अन्यथा, त्यांचे बंधू विनोद पाटील यांचे नाव पुढे केले जाऊ शकते, असाही एक पर्याय असल्याचे बोलले जात आहे.
काँग्रेस पक्षातर्फे संतोष केणे हे इच्छुक आहेत. त्यांच्यामागे आगरी, कुणबी, कोळी समाजाचे पाठबळ असल्याचा त्यांच्याकडून दावा केला जात आहे. सर्व पक्षांतील इच्छुकांवर नजर टाकल्यास बहुतांश प्रमुख उमेदवार आगरी समाजाचे आहेत. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत आगरी विरुद्ध आगरी असा सामना रंगू शकतो.

२०१४ च्या निवडणुकीत युती नसल्याने भाजपने शिवसेनेला शह देण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, तुल्यबळ उमेदवार नसल्याने भाजपचा प्रयत्न फसला होता. आता भाजपतर्फे माजी उपमहापौर मोरेश्वर भोईर, नंदू परब, महेश पाटील यांच्या नावाची चर्चा आहे. महेश पाटील हे एका सुपारी प्रकरणाच्या आरोपात न्यायालयीन कोठडीत आहेत. त्यामुळे पक्ष त्यांच्या उमेदवारीचा विचार करणार नसल्याने भोईर यांना टक्कर देण्यासाठी भाजपकडे तुल्यबळ उमेदवार नाही. कल्याण ग्रामीणमधून अपक्ष उमेदवार कुणाल पाटील यांचा कल भाजपकडे होता. तेदेखील कल्याण ग्रामीणमधून इच्छुक आहे. भाजपने उमेदवारी दिल्यास ते तुल्यबळ ठरू शकतात. पक्षाने उमेदवारी दिली नाही तर, अपक्ष उमेदवार म्हणून उतरण्याचीही त्यांची तयारी आहे.

Web Title: In Shiv Sena, a crowd of aspirants will become the cause of problem

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.