डोंबिवली : केडीएमसीच्या कल्याणमधील रुक्मिणीबाई आणि डोंबिवलीतील शास्त्रीनगर रुग्णालयातील गैरसोयींच्या निषेधार्थ रिपब्लिकन पक्षाने (आठवले गट) शुक्रवारी दुपारी १२ वाजता शास्त्रीनगर रुग्णालयावर मोर्चा काढला. या वेळी विविध मागण्यांचे निवेदन मुख्य वैद्यकीय अधिकारी आर. डी. लवंगारे यांना देण्यात आले. महापालिका रुग्णालयात कोणत्याच आजारांवर उपचार होत नाहीत. रुग्णांना इतर रुग्णालयांत पाठवले जाते, याकडे पक्षाचे डोंबिवली शहर युवा नेते मिलिंद साळवे यांनी लक्ष वेधले. यासंदर्भात नागरिकांच्या तक्रारी वाढल्या होत्या. त्यामुळे प्रशासनाच्या निषेधार्थ हा मोर्चा काढला होता. सम्राट अशोक चौक येथून निघालेला मोर्चा दीनदयाळ रोडमार्गे शास्त्रीनगर रुग्णालयावर धडकला. या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर रुग्णालय परिसरात मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. पक्षाचे डोंबिवली शहराध्यक्ष अंकुश गायकवाड यांनी मोर्चाचे नेतृत्व केले. मोर्चेकऱ्यांनी रुग्णालय प्रशासन आणि सत्ताधाऱ्यांच्या निषेधार्थ जोरदार घोषणाबाजी केली. या वेळी मोर्चेकऱ्यांच्या शिष्टमंडळाने वैद्यकीय अधिकारी लवंगारे यांंच्याशी चर्चा केली. एक्स रे मशीन चालवणारे टेक्निशियन वाढवा, सोनोग्राफी चालवण्यासाठी रेडिओलॉजिस्ट व टेक्निशियन उपलब्ध करा, रुग्णालयातील डॉक्टरांचे खाजगी मेडिकलशी साटेलोटे आहे. त्यांच्यासंदर्भात मोठ्या प्रमाणावर तक्रारी असल्याने याची चौकशी करून दोषींवर कारवाई करा. जेनेरिक मेडिकल स्टोअर सुरू करा. तज्ज्ञ डॉक्टरांची संख्या वाढवा. बंद असलेले सूतिकागृह लवक रात लवकर सुरू करा आणि त्याला सावित्रीबाई फुले यांचे नाव द्या, अशा मागण्या या वेळी करण्यात आल्या. (प्रतिनिधी)
शास्त्रीनगर रुग्णालयावर रिपब्लिकनची धडक
By admin | Updated: December 24, 2016 03:04 IST