लोकमत न्यूज नेटवर्क
अंबरनाथ : गेल्या आठ वर्षांपासून विविध कारणाने बंद असलेला अंबरनाथच्या आनंदनगर औद्योगिक वसाहतीमधील सामायिक सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प लवकरच सुरू होणार आहे. एमआयडीसीतील एका कंपनीचे प्रक्रिया केलेले पाणी केंद्रात सोडून बुधवारी प्रकल्प कार्यान्वित करण्यात आला. या प्रकल्पामुळे कंपन्यांतील प्रदूषित पाणी प्रक्रिया करून कल्याणच्या खाडीत सोडण्यात येणार असल्याने अंबरनाथमधील प्रदूषणाचा त्रास कमी होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.
एमआयडीसीचे कार्यकारी अभियंता राजाराम राठोड यांच्या हस्ते आनंदनगर अतिरिक्त मॅन्युफॅक्चरिंग असोसिएशन (आमा)चे अध्यक्ष उमेश तायडे यांच्या उपस्थितीत क्रिस्टल ॲक्वाकेम कंपनीतील प्रक्रिया केलेले पाणी प्रायोगिक तत्त्वावर सीईटीपी केंद्रात सोडण्यात आले. येत्या काही महिन्यात एमआयडीसीतील १२० रासायनिक कंपन्यांतील पाणी प्रक्रिया केंद्रात जमा करून ते थेट कल्याणच्या खाडीपर्यंत नेऊन सोडण्यात येणार आहे. यामुळे शहरातील जलप्रदूषणाला आळा बसणार असल्याचे तायडे यांनी सांगितले.
सीईटीपी प्रकल्पाला २०१३मध्ये सुरुवात झाली होती. २०१६ मध्ये ‘आमा’कडे त्याचा ताबा देण्यात आला होता. मात्र काही तांत्रिक कारणांमुळे प्रकल्पाचे काम रखडले होते. सात एमएलडी क्षमता असलेल्या प्रकल्पात १२० कंपन्यांमधील रासायनिक पाण्यावर प्रक्रिया करण्याची क्षमता आहे. सीईटीपी प्रकल्प कार्यान्वित नसल्याने एमआयडीसीतील काही कंपन्या अन्य राज्यात स्थलांतरित झाल्या. काही कंपन्यांनी उत्पादन थांबवले होते. त्याचा फटका औद्योगिक क्षेत्राला बसला होता; मात्र प्रकल्प कार्यान्वित झाल्याने उद्योजकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाल्याचे तायडे म्हणाले.
एमआयडीसी, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि आमा यांच्या सहकार्यातून सुरू झालेल्या सीईटीपी प्रकल्पामुळे कारखानदारांचे उत्पादन दुपटीने वाढण्यास मदत होणार आहे. हा प्रकल्प पूर्णपणे कार्यान्वित झाल्यांनतर एमआयडीसीमधील रासायनिक पाण्याचा थेंबही वालधुनी नदीमध्ये जाणार नाही अशी ग्वाही तायडे यांनी यावेळी दिली. सी.एस. निखार, मकरंद पवार, संदीप तोंडापूरकर आदी उपस्थित होते.