ठाणे : आदिवासींची अर्भके कुपोषणाने मृत्युमुखी पडत आहेत. मात्र, सरकार ते मुर्दाडपणे पाहत आहे. असंवेदनशील असलेले देवेंद्र फडणवीस सरकार केवळ स्मार्ट, डिजिटल इंडियाच्या नावाखाली भांडवलदारांचे हित साधत आहेत. अशा या सरकारच्या निषेधार्थ श्रमजीवी संघटना १५ मार्चला होळीची बोंब मारणारा ‘शिमगा मोर्चा’ काढणार आहे. यावेळी आदिवासी रंगीबेरंगी पोषाख परिधान करून वेगवेगळ्या रूपांची सोंगे घेऊन या मोर्चात हजारोच्या संख्येने सहभागी होणार असल्याचे श्रमजीवीचे संस्थापक अध्यक्ष विवेक पंडित यांनी ‘लोकमत’ला सांगितले. आदिवासींची मुले कुपोषणाने मृत्युमुखी जात असली तरी यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांचे पोषण व्हावे म्हणून त्यांना खास कोंबड्याची भेट मोर्चेकऱ्यांकडून देण्यात येणार आहे.जिल्हाधिकारी कार्यालयावर काढण्यात येणाऱ्या या मोर्चात आदिवासी, दुर्गम, ग्रामीण भागात वास्तव्यास असणारे कार्यकर्ते ट्रक, टेम्पोने हजारोच्या संख्येने येणार आहेत. मरणाच्या दारात असलेल्या कुपोषित बालकाना वाचवण्यासाठी रोजगार हमीच्या कामांची थकवलेली मजुरी द्या, रोजगार हमीची प्रभावी अंमलबजावणी, अंत्योदय योजनेचा लाभ द्या, सरकारी, खाजगी, वनजागेवरील घर नावे करा, समान कामाला समान वेतन , अन्न, पाणी, निवारा आदी हक्क प्राप्त करण्यासाठी हा शिमगा मार्चा काढला जात आहे.याशिवाय ठाणे, पालघर, मुंबई, नाशिक, रायगड जिल्ह्यासोबतच राज्यातील आदिवासींच्या मूलभूत गरजांबाबत शिमगा मोर्चाव्दारे श्रमजीवी सरकारला जाब विचारणार आहेत. या मोर्चेकरांना विवेक व विद्युल्ल्ता पंडित हे मार्गर्शन करणार आहेत. या मोर्चाचे नेतृत्व रामभाऊ वारणा, केशव नानकर, बाळाराम भोईर, विजय जाधव, दत्तात्रेय कोळेकर, अशोक सापटे, सुरेश रेंजड, लक्ष्मण पडवळ, आदी करणार असून त्यासाठी जनजागृती व नियोजनाचे काम युद्धपातळीवर सुरू झाले आहे.(प्रतिनिधी)
श्रमजीवींचा ठाण्यात बुधवारी ‘शिमगा मोर्चा’
By admin | Updated: March 14, 2017 01:23 IST