- राहुल वाडेकरविक्रमगड : पालघर जिल्ह्यातील विक्रमगड, मोखाडा, जव्हार, वाडा या तालुक्यांतील शेकडो गाव-पाड्यांना अनेक वर्षांपासून पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. मोखाडा, जव्हार या भागांत आतापासूनच टँकरचे प्रस्ताव तहसीलदार कार्यालयाकडे पाठवलेले आहेत. दरवर्षी या तालुक्यातील हजारो नागरिकांना पाणीटंचाईशी दोन हात करावे लागतात. या पार्श्वभूमीवर शासनाने धोरणात्मक निर्णय घेऊन या पाणीटंचाईवर कायमचा तोडगा काढावा, अशी मागणी येथील नागरिक करत आहेत.मोखाडा, जव्हार, विक्रमगड व वाडा हे तालुके डोंगराळ भागात आहेत. त्यामुळे दरवर्षी फेब्रुवारीनंतर या पाणीटंचाईचे चटके साेसावे लागतात. मोखाडा तालुक्यात आसे गावातील दापडी एक व दोन या पाड्यांसाठी पाणी टँकरचा प्रस्ताव तहसीलदारांकडे सादर केलेला आहे, तर जुने जव्हार भागातील काळीधोंड या गावासाठीही एका टँकरचा प्रस्ताव पाठवलेला आहे. फेब्रुवारीनंतर पाणीटंचाईची झळ बसणाऱ्या मोखाडा तालुक्यात दरवर्षी सुमारे ९३ गावपाड्यांना टंचाईच्या समस्येला सामोरे जावे लागते.शासनामार्फत अनेक वेळा येथील पाणीटंचाईचा निपटारा करण्यासाठी मोठमोठ्या योजना प्रस्तावित केल्या होत्या. मात्र, या योजना अजूनही कागदावरच लालफितीत अडकल्या आहेत. माेखाडा तालुक्यातील देवबांध, निळमाती, आसे, शास्त्रीनगर व धामणीच्या मागे नदी व नाले यांचे चांगले पाणी स्राेत आहेत. तेथे बंधारे बांधून पाणीपुरवठ्याचे नियोजन केल्यास येथील टंचाई दूर होईल, असे काही तज्ज्ञांनी सांगितले. मात्र, या तालुक्यांतील पाणीटंचाई दूर करण्यासाठी येथील लोकप्रतिनिधींचा मोठा अभाव दिसत आहे. राज्य शासनाने धोरणात्मक निर्णय घेऊन नळपाणीपुरवठा योजना सुरू करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
चार तालुक्यांमध्ये गंभीर पाणीटंचाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2021 02:02 IST