रवींद्र साळवे, लोकमत न्यूज नेटवर्क |मोखाडा : सहा घरांची वस्ती असलेल्या कोल्हेधव गावात जेमतेम तीस ते चाळीस माणसे राहतात. येथील नागरिकांना इतर मूलभूत सुविधांची तर वानवा आहे. परंतु त्याहीपेक्षा पिण्यासाठी चांगले पाणी मिळावे, यासाठी सात-आठ वर्षांत २० ते २५ लाख रुपयांचा निधी पाणीटंचाई दूर करण्यासाठी खर्च केलेला असतानाही येथील नागरिकांना महिन्याभरापासून पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. येथील विहिरींनी आताच तळ गाठल्याने कोल्हेधववासीयांचा घसा कोरडा पडला आहे.
महत्त्वाचे म्हणजे कोल्हेधव गाव मोखाडा तालुक्यात येत असून, गावात जायला पूल नाही, त्यामुळे पाणीपुरवठा करण्यासाठी तालुक्यातील बलद्याचापाडा मार्गाने नाशिक जिल्ह्यातील आडगाव, काकडवळण या मार्गाने जवळपास चाळीस ते पन्नास किलोमीटरचे अंतर पार करून कोल्हेधव गावाला पाणी पुरविण्याची नामुश्की प्रशासनावर ओढवली आहे. यामार्गे टँकरने ये-जा करण्यासाठी संपूर्ण दिवस जाणार असल्याने ग्रामपंचायत प्रशासनाने पर्यायी पिण्याचे पाणी उपलब्ध करून द्यावे, अशी सूचना पाणीपुरवठा विभागाकडून करण्यात आल्याचे कर्मचाऱ्यांनी सांगितले आहे. मुळात कोल्हेधव गावात यायला जायला पूल बांधला असता तर शासनाचा वेळ आणि पैसा दोन्ही वाचले असते. परंतु येथील लोकसंख्येचा आकडा लक्षात घेता या पाड्याला पुरेसा निधी शासनाकडून उपलब्ध होण्यास अडचण येत असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क, विक्रमगड : दिवसेंदिवस तापमानात वाढ होत असताना विक्रमगड तालुक्यातील विविध गावपाड्यात पाणीटंचाई जाणवू लागली आहे. अनेक गावांतील विहिरी आटू लागल्या आहेत. तालुक्यातील खुडेद ग्रामपंचायत हद्दीतील घोडीचापाडा येथील विहिरींनी तर आताच तळ गाठले असून या भागातील लोकांना पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे. ग्रामपंचायतीने पाणीटंचाई दूर करण्यासाठी टँकरची मागणी केली असून तत्काळ टँकर उपलब्ध झाला तर या भागातील नागरिकांना पाणी मिळणार आहे. तालुक्यातील इतरही काही गावपाड्यांना येत्या दिवसांत पाणीटंचाईला सामोरे जावे लागणार आहे.