मुंबई : कल्याण-डोंबिवली महापालिका निवडणूक शिवसेना-भाजपाने एकत्रितपणे लढावी, यासाठी स्वत: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेनेचे मंत्री एकनाथ शिंदे आग्रही असल्याचे समजते. कल्याण-डोंबिवली महापालिका निवडणूक भाजपा व शिवसेना हे स्वतंत्र लढतील व निकालानंतर सत्ता स्थापनेकरिता एकत्र येतील, अशीच सध्याची चिन्हे दिसत असली तरी मुख्यमंत्री फडणवीस यांना युती हवी आहे व त्यांनी शिवसेनेच्या काही नेत्यांकडे तशी भावना बोलून दाखवल्याचे समजते. या निवडणुकीच्या प्रचाराची धुरा मुख्यत्वे फडणवीस यांच्या खांद्यावर राहणार आहे. या महापालिकेत भाजपाची स्वबळावर सत्ता यावी,असा भाजप नेतृत्वाचा आग्रह असला तरी शिवसेनेला सोबत घेतल्याखेरीज ते अशक्य आहे, हे फडणवीस जाणून आहेत.सध्या भाजपाचे संख्याबळ एक अंकी असून ते ४० ते ५० जागांपर्यंत नेण्याचे मोठे आव्हान असणार आहे. निकालानंतर तसे चित्र तयार झाले नाही व नवी मुंबईत बसला तसा फटका बसला तर पक्षांतर्गत विरोधकांच्या टीकेचे फडणवीस यांनाच धनी व्हावे लागेल. मात्र युतीचा निर्णय राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्या दरबारात होत असल्याने फडणवीस यांचे हात बांधलेले आहेत. त्यातच भाजपाचे काही मंत्री स्वतंत्र लढण्याचा आग्रह धरीत असून त्या मंत्र्यांचा कल्याण-डोंबिवलीत प्रभाव आहे. त्यामुळे स्वतंत्र निवडणूक लढण्याचा निर्णय झाल्यास शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्याकडे प्रचाराची धुरा सोपवण्याची खेळी फडणवीस खेळण्याची शक्यता आहे.
केडीएमसीत वरिष्ठ नेत्यांना युती हवी
By admin | Updated: October 3, 2015 03:19 IST