ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या रोपवाटिकेतील रोपे गेली सुकून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2021 12:14 AM2021-04-10T00:14:58+5:302021-04-10T00:15:05+5:30

लागवडच केली नाही; वनविभागाचा भोंगळ कारभार, तीन लाख खर्च करून विविध जातींची २२ हजार रोपे केली होती तयार

The seedlings in the nursery of the Rural Employment Guarantee Scheme have dried up | ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या रोपवाटिकेतील रोपे गेली सुकून

ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या रोपवाटिकेतील रोपे गेली सुकून

Next

शेणवा : राज्य सरकारच्या १३ कोटी वृक्ष लागवड योजनेंतर्गत वृक्ष लागवडीसाठी महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेतून खर्च करून रोपवाटिकेत तयार करण्यात आलेल्या रोपांची वनविभागाने लागवडच केलेली नाही. रोपे पाण्याविना जागीच सुकून गेली असल्याने वनविभागाच्या भोंगळ कारभारावर संताप व्यक्त केला जात आहे.

राज्य सरकारने २०१६-१७ मध्ये दोन कोटी, २०१७-१८ मध्ये चार कोटी व सन २०१८ - १९ मध्ये १३ कोटी वृक्ष लागवडीचे धोरण अवलंबिले होते. यातील १३ कोटी वृक्ष लागवड योजनेंतर्गत रोपे लावण्यासाठी वनविभागाच्या शहापूर तालुक्यातील डोळखांब वन परिक्षेत्र अंतर्गत असणाऱ्या खराडे परिमंडळातील वेहलोली रोपवाटिकेत निवृत्त वनपाल पी.पी. पाटील यांच्या नियंत्रणाखाली महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेतील तीन लाख खर्च करून प्रति हेक्टरी ११०० रोपांची लागवड याप्रमाणे २० हेक्टर क्षेत्रात लागवडीसाठी विविध जातींची २२ हजार रोपे तयार केली होती. यातील किमान चार ते पाच हजार रोपांची वनविभागाने लागवडच न केल्याने रोपे दुर्लक्षित रोपवाटिकेत पाण्याविना सुकून गेल्याने निसर्गप्रेमी, वृक्षप्रेमी हळहळ व्यक्त करीत आहेत.  नदीकिनारीच असणाऱ्या या रोपवाटिकेकडे वनविभागाचा एकही कर्मचारी साधा फिरकतही नाही.

यावर्षी रोपवाटिकेसाठी वनविभागाकडून निधीच उपलब्ध नसल्याने रोपवाटिका बंद करण्यात आल्या आहेत.
    - पी. के. थोरे, वनपाल

डोळखांब वनपरिक्षेत्र हद्दीतील साकुर्ली व वेहलोली येथे रोपवाटिका आहेत. निधीअभावी तसेच वृक्ष लागवडीचे यावर्षी लक्ष्यही नसल्याने वेहलोली येथील रोपवाटिका बंद करण्यात आली असून यावर्षी या रोपवाटिकेतील रोपे लावण्यात येतील.
    - पी. आर. निकाळजे, वनपरिक्षेत्र     अधिकारी, डोळखांब

रोपवाटिकेसाठी सरकारकडून निधी मंजूर नसल्याने तालुक्यातील रोपवाटिका बंद केल्या असून शहापूर नर्सरीत रोपे मोठ्या प्रमाणात असल्याने दुसरी रोपे तयार करण्याची आवश्यकता नाही. याच रोपांची लागवड यावर्षी करण्यात येणार आहे.    - बी. टी. घुले, उपवन संरक्षक, शहापूर

Web Title: The seedlings in the nursery of the Rural Employment Guarantee Scheme have dried up

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.