जिवंत असेपर्यंत पाच मिनिटं तरी भेटू द्या!, नातेवाइकांची विनवणी 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2021 12:02 AM2021-04-21T00:02:29+5:302021-04-21T00:02:41+5:30

अंबरनाथ कोविड सेंटरमधील प्रकार

See you for at least five minutes while you're alive !, pleading with relatives | जिवंत असेपर्यंत पाच मिनिटं तरी भेटू द्या!, नातेवाइकांची विनवणी 

जिवंत असेपर्यंत पाच मिनिटं तरी भेटू द्या!, नातेवाइकांची विनवणी 

googlenewsNext


लोकमत न्यूज नेटवर्क 
अंबरनाथ : व्हेंटिलेटरवर असलेल्या कोरोना रुग्णाला भेटण्यासाठी नातेवाइकांनी रुग्णालयाबाहेर ठिय्या आंदोलन केल्याचा प्रकार अंबरनाथमध्ये घडला आहे. अंबरनाथ पालिकेच्या डेंटल कॉलेजमधील कोविड केअर सेंटरबाहेर मंगळवारी हा प्रकार घडला.


अंबरनाथच्या शिवगंगा नगरमध्ये राहणारे गौतम तेलंग हे मागील १४ दिवसांपासून अंबरनाथ पालिकेच्या कोविड केअर सेंटरमध्ये दाखल आहेत. ते दाखल झाले तेव्हा त्यांची ऑक्सिजन पातळी ९४ होती. त्यामुळे नातेवाइकांनी सहा रेमडेसिविर इंजेक्शन आणून दिले. मात्र, त्यानंतरही त्यांची प्रकृती खालावत गेली आणि त्यांना व्हेंटिलेटर लावण्यात आले. या १४ दिवसांत तेलंग यांचे एकदाच नातेवाइकांशी व्हिडिओ कॉलवरून बोलणे झाले. यावेळी आपल्याला जेवण दिले जात नसून, आपल्याकडे लक्षही दिले जात नसल्याची तक्रार त्यांनी केली होती. त्यामुळे धास्तावलेल्या तेलंग कुटुंबीयांनी एकदा तरी तेलंग यांना भेटू द्यावे, अशी मागणी हॉस्पिटल प्रशासनाकडे केली. मात्र, कोविड नियमांमुळे ती मान्य करण्यात आली नाही. त्यामुळे मनसेचे शहर सचिव अविनाश सुरसे यांच्यासह तेलंग यांची पत्नी, मुलगा आणि मुलगी हे कोविड केअर सेंटरबाहेर आले आणि किमान पाच मिनिटे पीपीई कीट घालून तरी आम्हाला त्यांना भेटू द्या, अशी मागणी त्यांनी केली. या मागणीसाठी त्यांनी गेटवरच ठिय्या मांडला.


घटनेची माहिती मिळताच अंबरनाथ पोलीसही तिथे दाखल झाले, मात्र कुटुंबीयांची मागणी कायम होती. गेल्या १४ दिवसांपासून रुग्ण इथे दाखल असताना त्यांची खुशाली कळवली जात नाही, त्यांना जेवण दिले जात नाही. त्यांचे अंगही पुसले जात नाही, असा आरोप परिवाराने केला. रुग्ण उपचार घेत असताना कुटुंबीयांचा मानसिक आधार रुग्णासाठी गरजेचा असतो. त्यामुळे किमान पाच मिनिटे तरी त्यांना भेटू द्या, अशी मागणी यावेळी मनसेने केली. तर जोपर्यंत ते जिवंत आहेत, तोपर्यंत आम्हाला भेटू द्या, अन्यथा  मृतदेह हातात देणार का? असा सवाल केला.

पीपीई किट घालून मुलाने घेतली भेट
nअशी आर्त विनवणी तेलंग कुटुंबीयांनी केली. त्यामुळे हॉस्पिटल प्रशासन आणि पोलीसही निःशब्द झाले. अखेर तेलंग यांचा मुलगा हर्षदीप याला पीपीई कीट घालून पाच मिनिटांसाठी वडिलांना भेटू दिले. कोरोनाचा रुग्ण दाखल झाल्यावर त्याला कुणालाच भेटता येत नाही. यामुळे नातेवाइकांची 
घालमेल होते. 
nआपली व्यक्ती बरी असेल ना, त्याची काळजी घेतली जात असेल ना, औषधे वेळेत दिली जात असतील ना असे प्रश्न नातलगांना सतावत असतात. पण ते काळजी करण्याव्यतिरीक्त काहीच कळू शकत नाही. त्यामुळे बाधितांची चांगली काळजी घेतली जावी, एकाला तरी भेटण्याची मुभा द्यावी अशी मागणी सातत्याने केली 
जात आहे. 

Web Title: See you for at least five minutes while you're alive !, pleading with relatives

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.