अजित मांडके
ठाणे महापालिका निवडणुकीपूर्वी जागा वाटपाच्या तहात शिंदेसेनेने भाजपवर मात केली. ठाण्यात ५० ते ५५ जागांवर दावा करणाऱ्या भाजपला जेमतेम ४० जागा मिळाल्या. मात्र, मुंबईत केवळ ५५ जागा देऊ करणाऱ्या भाजपला नमवत शिंदेसेनेने ९१ जागा घेतल्या. या जागा वाटपाचा परिणाम होणार आहे. भाजपला दिलेल्या जागांपैकी नऊ जागा या कळवा, मुंब्रा परिसरातील असल्याने प्रत्यक्षात ३१ जागांवर भाजपची बोळवण केली आहे. गेल्या वेळी २३ जागांवर विजय मिळवणाऱ्या भाजपला मागच्या वेळची ताकद टिकवण्यासाठी धडपड करावी लागेल, असे दिसते. विधानसभा निवडणुकीत ठाणे जिल्ह्यात मोठा भाऊ झालेल्या भाजपला महापालिकेत छोटा भाऊ होऊन राहावे लागणार आहे, असे म्हटले जाते.
शिंदेसेना भाजप युतीत लढत असली तरी त्यांनी आपला प्रचार वेगळा ठेवला आहे. राष्ट्रवादी (अजित पवार) गटाने स्वतंत्र चूल मांडली आहे. महाविकास आघाडीतून काँग्रेस बाहेर पडली आहे. प्रचारात काँग्रेस पिछाडीवर आहे. आघाडीत राष्ट्रवादी (शरद पवार) पक्ष काहीसा अलिप्त राहिला आहे. उद्धवसेना आणि मनसेने सत्ताधाऱ्यांच्या विरोधात आवाज उठवत आहे. मात्र, त्यांना नेत्यांचे भक्कम पाठबळ असल्याचे दिसत नाही. ठाण्यातील राजकीय समीकरणे निवडणुकीच्या अंतिम टप्प्यात बदलली आहेत.
ठाण्यात भाजप, शिंदेसेना आणि राष्ट्रवादी (अजित पवार) यांची महायुती निवडणुकीच्या मैदानात उतरली आहे. विकासकामे, केंद्र आणि राज्य सरकारच्या योजनांचा दाखला देत महायुती मतदारांकडे स्थैर्य आणि विकास या मुद्यांवर मते मागत आहे. उपमुख्यमंत्री शिंदे यांचे ठाण्याशी असलेले भावनिक नाते आणि भाजपची संघटनात्मक ताकद हे महायुतीचे प्रमुख भांडवल आहे. दुसरीकडे उद्धवसेना आणि मनसेकडून शिंदेसेनेला आव्हान देण्याचा प्रयत्न होत आहे; परंतु यात राष्ट्रवादी (शरद पवार) बाजूला पडला आहे. राष्ट्रवादी (शरद पवार) ची लढत राष्ट्रवादी (अजित पवार) सोबत आहे. आ. जितेंद्र आव्हाड यांच्यापुढे कळवा, मुंब्यात अस्तित्व टिकविण्याचे आव्हान आहे. राष्ट्रवादी (अजित पवार) ने ठाण्यातील एका प्रभागासह केवळ मुंब्याकडेच लक्ष केंद्रित केले आहे. महापालिकेतील Mumbai Main कथित भ्रष्टाचार, वाहतूक कोंडी, प्रदूषण आणि नागरी सुविधांचा अभाव हे मुद्दे आघाडीच्या प्रचाराचे केंद्रबिंदू ठरत आहेत, तर शिंदेसेना आणि भाजप हे युतीत असले तरी भाजपने स्वतंत्र वचननामा जाहीर केला. ठाणेकर मतदारांसाठी पाणीपुरवठा, कचरा व्यवस्थापन, रस्त्यांची अवस्था, वाहतूककोंडी, प्रदूषण, आरोग्य सुविधा आणि अनधिकृत बांधकामे हे मुद्दे अत्यंत महत्त्वाचे ठरले आहेत. मेट्रो, कोस्टल रोड, क्लस्टर डेव्हलपमेंट आणि स्मार्ट सिटीसारख्या प्रकल्पांवर सत्ताधारी भर देत असताना, विरोधक प्रत्यक्ष अंमलबजावणी आणि नागरिकांच्या दैनंदिन अडचणींचा पाढा वाचत आहेत. बिनविरोध आलेल्या शिंदेसेनेच्या सहा नगरसेवकांमुळे मनसे आणि उद्धवसेना त्याच मुद्यावरून सत्ताधाऱ्यांना घेरत आहे. उद्धवसेना, मनसेच्या मोठ्या नेत्यांनी जेवढे मुंबईवर लक्ष दिले तेवढे ठाण्यावर दिलेले नाही.
बंडखोरी आणि अपक्षांची डोकेदुखी
या निवडणुकीतील सर्वात मोठा फॅक्टर म्हणजे बंडखोरी. उमेदवारी न मिळाल्याने अनेक इच्छुकांनी अपक्ष म्हणून रिंगणात उडी घेतली. अनेक प्रभागांमध्ये पक्ष अधिकृत उमेदवारांसमोरच बंडखोरांचे आव्हान उभे आहे. त्यामुळे थेट पक्षाविरुद्ध पक्ष उभा न राहता तिरंगी आणि काही ठिकाणी चौरंगी लढती निर्माण झाल्या आहेत. याचा फटका कोणाला बसणार, हे निकालानंतरच स्पष्ट होईल.
समाजकारण आणि मतांचे गणित-कोळी समाज, मराठी मतदार, उत्तर भारतीय, गुजराती आणि विविध मध्यमवर्गीय घटकांचे मोठे मतदान आहे. त्यामुळे समाजाधारित समीकरणे आणि स्थानिक नेत्यांची प्रतिमा निर्णायक ठरण्याची शक्यता आहे. अलीकडील काळात वादग्रस्त वक्तव्ये, ऑडिओ क्लिप्स आणि आरोप-प्रत्यारोपांमुळे २ सामाजिक तणाव निर्माण होऊ नये यासाठी निवडणूक यंत्रणेसमोरही मोठे आव्हान आहे. आचारसंहिता लागू असताना प्रचारातील भाष्य, सोशल मीडियावरील संदेश आणि सभांमधील वक्तव्यांवर निवडणूक आयोगाचे बारकाईने लक्ष आहे. कायदा आणि सुव्यवस्था राखणे हे पोलिस प्रशासनासमोर मोठे आव्हान आहे.
Web Summary : In Thane, BJP secured fewer seats than desired in pre-election alliance talks. Despite this, the BJP faces challenges retaining its previous strength amid shifting political dynamics and multi-cornered fights. Focus on development and stability versus opposition criticism.
Web Summary : ठाणे में चुनाव पूर्व गठबंधन वार्ता में भाजपा को मनचाही सीटें नहीं मिलीं। इसके बावजूद, भाजपा को बदलते राजनीतिक समीकरणों और बहुकोणीय लड़ाइयों के बीच अपनी पिछली ताकत बनाए रखने की चुनौती का सामना करना पड़ रहा है। विकास और स्थिरता पर ध्यान केंद्रित बनाम विपक्षी आलोचना।