ठाणे - अभिनेता सैफअली खान याच्यावर हल्ला करणारा शहजाद हा मेट्रोच्या कामासाठी नव्हता, असा दावा मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) केला आहे. याठिकाणी मजुरांची नेमणूक करणे आणि त्यांच्या राहण्यासाठी सर्व सुविधा पुरविणे याची जबाबदारी ही संबंधित ठेकेदाराची असल्याचेही एमएमआरडीएने आपल्या खुलाशामध्ये म्हटले आहे.
‘मेटोच्या कामासाठी बांगलादेशी कामगारांचा भरणा’ या मथळ्याखाली २० जानेवारीच्या ‘लोकमत’च्या अंकात बातमी प्रसिद्ध झाली होती. यात शहजाद हल्लेखोर मेट्रो कामासाठीच्या मजुरांमध्ये काम करीत होता, अशी माहिती स्थानिकाने दिल्याचा उल्लेख आहे.
कंत्राटानुसार सर्व जबाबदारी कंत्राटदारचीयाच अनुषंगाने एमएमआरडीए प्राधिकरणाने स्पष्ट केले की, सर्व मजुरांच्या आधार कार्डची शहानिशा करून त्यांना रुजू करणे, त्यांची नोंदणी कामगार आयुक्त कार्यालयात करणे, त्यांना महाराष्ट्र इमारत आणि इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ अंतर्गत नियमांनुसार सुविधा देणे, इत्यादीची सर्व जबाबदारी ही कंत्राटानुसार कंत्राटदाराची आहे.
कंत्राटी कामगारसेवा (विनियमन व उच्चाटन) अधिनियम, महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ अंतर्गत नियम व इतर कोण्त्याही कामगार नियमांचे उल्लंघन केल्यास तसेच त्यात कसूर राहिल्यास आवश्यक ती कार्यवाही एमएमआरडीएमार्फत करण्यात येते, असेही आपल्या पत्रात मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने म्हटले आहे.