लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : मुंबईत हक्काचे घर नव्हते, तेव्हा साहित्य संघात राहिलो होतो. साहित्य संघाचे हे उपकार आपण कधी विसरुच शकणार नाही अशी कृतज्ञता ज्येष्ठ नाट्यकलावंत आणि अखिल भारतीय मराठी नाट्यसंमेलनाचे अध्यक्ष जयंत सावरकर यांनी व्यक्त केली.मुंबई मराठी साहित्य संघ आणि दि गोवा हिंदू असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित दामू केंकरे स्मृती नाट्योत्सवाचे उद्घाटन करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी, दि गोवा हिंदू असोसिएशनच्या वतीने श्रीपाद काबाडी यांनी संस्थेच्या उपक्रमांची माहिती दिली. तर साहित्य संघाच्या कार्याध्यक्षा उषा तांबे यांनी साहित्य संघांचे आणि जयंत सावरकर यांचे नाते किती जिव्हाळ््याचे आहे, हे सांगितले. सावरकर पूर्वी नाटकांसाठी प्रॉम्प्टर म्हणून काम करत असत आणि हे प्रॉम्प्टरचे काम किती कठीण असते हे देखील त्यांनी सांगितले.साहित्य संघाचे प्रमुख कार्यवाह डॉ.बाळ भालेराव यांच्या हस्ते जयंत सावरकर यांचा शाल, श्रीफळ आणि फळांची परडी देऊन सत्कार करण्यात आला. किर्ती शिलेदार यांच्या स्वयंवरच्या पहिल्या प्रयोगात भूमिका करणारा एक कलावंत येऊ शकणार नव्हता आणि त्यामुळे एका दिवसात काम कोण करणार ? असा प्रश्न निर्माण झाला होता, ते काम मी केले आणि साहित्य संघात झालेला तो पहिला प्रयोग हा कायम स्मरणात राहिल असेही सावरकर यांनी सांगितले. विश्राम बेडेकर यांच्या ‘टिळक आणि आगरकर’ , ‘वाजे पाऊल आपले’ या नाटकांच्या आठवणींनाही सावरकरांनी उजाळा दिला. त्याचप्रमाणे, साहित्य संघाने पुन्हा एकदा ‘टिळक आणि आगरकर’ नाटकाचा प्रयोग निर्माण करावा आणि त्यात आपण काम करण्यास तयार आहोत, अशी भावना देखील त्यांनी व्यक्त केली. उद्घाटन कार्यक्रमानंतर पं. जितेंद्र अभिषेकी यांनी स्वरबद्ध केलेल्या रचनांचा कार्यक्रम सादर झाला.
घर नव्हते तेव्हा साहित्य संघाने आधार दिला-जयंत सावरकर
By admin | Updated: May 9, 2017 00:51 IST