भिवंडी : महापालिकेने घेतलेले कर्ज व त्यावरील व्याजाने पाच वर्षांपासून महापालिकेची आर्थिक स्थिती डबघाईला आली. याकडे नगरसेवक आणि प्रशासनाचे लक्ष गेले नाही. परिणामी, नागरिकांना समस्यांना सामोरे जावे लागत आहे. दोन महिन्यांवर पालिका निवडणूक आल्याने विरोधी पक्षनेते खालीद गुड्डू यांना जाग आली आहे. त्यांनी थेट राज्यपाल विद्यासागर राव यांच्याकडे पालिका बरखास्त करून प्रशासकाची मागणी केली आहे. अधिकारी व कर्मचाऱ्यांवर आयुक्तांचा वचक राहिलेला नाही. त्यामुळे वसुलीच्या कामात भोंगळ कारभार सुरू आहे. गाजावाजा करत टोरंटो वीज कंपनीच्या कार्यालयाला लावलेले सील काही दिवसांपूर्वी काढण्यात आले. स्वराज्य संस्था कर (एलबीटी) वसुलीमध्ये काही अधिकाऱ्यांनी नगरसेवकांना हाताशी धरून वसुलीच्या कामात गैरव्यवहार केल्याचा आरोप होत आहे. एलबीटीची वसुली वेळेत न झाल्याने पालिकेला सुमारे १५०० कोटींचा तोटा झाला, अशी माहिती आयुक्त डॉ. योगेश म्हसे यांनी दिली. याची सध्या सरकारीपातळीवर चौकशी सुरू झाली आहे. मागील काही वर्षांत ४५० हून अधिक बेकायदा बांधकामे उभी राहिली. त्यामुळे पालिकेचा महसूल बुडाला याकडेही गुड्डू यांनी लक्ष वेधले आहे. (प्रतिनिधी)
भिवंडी पालिका बरखास्त करा
By admin | Updated: March 24, 2017 01:07 IST