ठाणे : ठाणे महानगरपालिकेने माजिवडा येथील कॅपिटॉल हॉटेल आयसोलेशनसाठी अधिग्रहीत केले आहे. यासाठी प्रत्येक रुग्णाकडून दोन हजार रुपये आकारण्यात येणार असल्याचे ठामपाने जाहीर केले होते. मात्र, सदर ठिकाणी तीन हजार ५०० रुपये आकारले जात असल्याचे मनसेचे प्रभाग अध्यक्ष महेश इंगळे यांनी उघडकीस आणले आहे. या संदर्भात त्यांनी सदर हॉटेलवर धडक देऊन जाब विचारला.
ठाण्यातील माजिवडा, घोडबंदर रोड येथील हॉटेल कॅपिटॉल हे हॉटेल हे कोविड-१९ विषाणूचा संसर्ग झालेल्या परंतु लक्षणे नसलेल्या रुग्णांना स्वतःच्या खर्चाने तपासणी आणि उपचारासाठी आयसोलेशन सेंटर म्हणून घोषित केले आहे. या सेंटरमध्ये दाखल होणा-या रुग्णांसाठी प्रतिदिन रुपये दोन हजार इतका दर निश्चित केला असून यामध्ये नाश्ता, दुपारचे जेवण, चहा आणि रात्रीचे जेवण देण्यात येणार असल्याचे ठाणे महानगरपालिकेने २३ एप्रिल २०२१ रोजी जाहीर केले होते. त्यानुसार, वृंदावन येथे राहणा-या एका महिलेसाठी मनसेचे प्रभाग अध्यक्ष महेश इंगळे यांनी कॅपिटॉल हॉटेलमध्ये संपर्क साधला असता, तेथे उपस्थित असलेल्या कर्मचा-याने एका रुग्णासाठी साडेतीन हजार रुपये आकारण्यात येतील; जर एक खोली दोघांनी घेतली तर दोन हजार रुपये आकारण्यात येतील, असे सांगितले. ठाणे महानगरपालिकेने प्रति रुग्ण दोन हजार रुपये दर आकारण्याचे निश्चित केलेले असल्याने त्यांनी थेट हॉटेल गाठून व्यवस्थापनाला जाब विचारला. हॉटेलचालकांकडून होणारी ही लूटमार सहन करणार नाही. सामान्य रुग्णांची लूट करणा-या या हॉटेलवर ठामपाने कारवाई न केल्यास पक्षाचे ठाणे-पालघर जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही ठामपा मुख्यालयासमोर आंदोलन छेडू, असा इशारा त्यांनी दिला.
महापालिका बिल देत नसल्याने जादा दरआकारणी
हाॅटेलचे व्यवस्थापक निश्चल पुजारी यांनी यावेळी सांगितले की, ठामपाकडून आम्हाला आमचे बिल दिले जात नसल्याने नाइलाजास्तव रुग्णांकडून जादा पैसे घ्यावे लागत आहेत.