rickshaws got after 50 days appointment for 'passing' | ‘पासिंग’साठी रिक्षाचालकांची परवड
‘पासिंग’साठी रिक्षाचालकांची परवड

कल्याण : रिक्षांची संख्या भरमसाट वाढत असताना ‘आरटीओ’कडून रिक्षांचे पासिंग वेळेत होत नसल्यामुळे रिक्षाचालक मेटाकुटीस आले आहेत. आरटीओकडील अपुऱ्या मनुष्यबळाअभावी पासिंगसाठी तब्बल ५० दिवसांचा विलंब लागत आहे. पहाटेपासून रांगेत उभे राहूनही लवकर नंबर लागत नसल्याने ‘पासिंग’विनाच रिक्षा रस्त्यावर धावत आहेत. फिटनेसअभावी रिक्षाला एखादा अपघात झाला, तर त्याला जबाबदार कोण, असा सवाल रिक्षाचालक करत आहेत. आरटीओने मनुष्यबळ वाढवण्याकडे त्यांनी लक्ष वेधले आहे.


कल्याण आरटीओ परिक्षेत्रात कल्याण-डोंबिवलीसह उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर शहरांचा अंतर्भाव होतो. परिक्षेत्रात नऊ लाखांच्या आसपास वाहने आहेत. यात रिक्षांची संख्या ५० ते ५५ हजारांच्या आसपास आहे. दरम्यान, ही संख्या दिवसागणिक वाढत चालली आहे. एकीकडे रोजगाराच्या उद्देशाने सरकारकडून रिक्षा परवान्यांचे वाटप सुरू असले, तरी यामध्ये रिक्षा व्यवसायातील स्पर्धा वाढल्याने उपासमारीचे संकट रिक्षाचालकांवर आले आहे. त्यामुळे रिक्षा संघटनांतर्फे परवान्यांचे वाटप थांबवा, अशी मागणी सातत्याने केली जात आहे. पण, त्याकडे सरकारचे दुर्लक्ष झाल्याने दिवसागणिक परिस्थिती अधिकच बिकट बनत चालली आहे. दरम्यान, रिक्षांचा लोंढा वाढत असताना रिक्षांच्या पासिंगसाठी आरटीओकडे नंबर लागणेही मुश्कील बनले आहे.


याआधी सात ते आठ दिवसांत नंबर लागायचा, पण सध्या तब्बल ५० दिवसांनी पासिंगची तारीख मिळत असल्याचे रिक्षाचालकांचे म्हणणे आहे. दर दोन वर्षांनी रिक्षांचे पासिंग करणे बंधनकारक आहे. यात तपासणी होऊन रिक्षा चालवण्यायोग्य आहे की नाही, याबाबत आरटीओकडून प्रमाणपत्र दिले जाते. कल्याण आरटीओकडून दिवसभरात ८० रिक्षांचीच तपासणी केली जात आहे. पासिंगसाठी विलंब लागत असल्याने नंबर वेळेवर लागावा म्हणून पहाटेपासूनच आरटीओकडून होणाºया तपासणीसाठी रांगा लावायला लागत असल्याकडे रिक्षाचालकांनी लक्ष वेधले आहे. कल्याण पूर्वेकडील मलंगरोडवरील नांदिवली परिसरात आरटीओकडून पासिंगसाठी येणाºया वाहनांची तपासणी केली जाते. तपासणीसाठी ट्रॅक उभारण्यात आला आहे. पण, त्याठिकाणी प्रसाधनगृहाची तसेच पिण्याच्या पाण्याचीही सुविधा नसल्याने पहाटेपासून रांगा लावणाºया रिक्षाचालकांना गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. वारंवार मागणी करूनही प्रसाधनगृहाची सुविधा उपलब्ध करून दिलेली नसल्याचे त्यांचे म्हणणे आहे. अपुरे मनुष्यबळ आहेच, शिवाय आरटीओतील अधिकारी आणि कर्मचारीवर्ग निवडणुकीच्या कामात व्यस्त आहे. याचा फटकाही रिक्षासह अन्य वाहनांच्या पासिंगलाही बसत आहे.


Web Title: rickshaws got after 50 days appointment for 'passing'
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.