लोकमत न्यूज नेटवर्क
कल्याण : कल्याण डोंबिवली महापालिका हद्दीत कोरोनारुग्णांची संख्या वाढत असताना सोशल डिस्टन्सिंग व मास्कचा वापर करा, असे वारंवार महापालिकेकडून सांगण्यात येते. मात्र, शुक्रवारी महापालिकेच्या साहाय्यक आयुक्तांच्या सेवानिवृत्ती निरोप सभारंभात सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाला होता. नागरिकांना कोरोनाचे नियम पाळण्यास सांगणाऱ्या महापालिकेनेच नियमांची पायमल्ली केल्याचे उघड झाले.
महापालिकेचे साहाय्यक आयुक्त अरुण वानखेडे हे सेवानिवृत्त झाले. त्यांना निरोप देण्याचा कार्यक्रम महापालिका मुख्यालयातील प्रशासकीय भवनातील स्थायी समितीच्या दालनात आयोजिला होता. या कार्यक्रमास अधिकारी व कर्मचारीवर्गाने गर्दी केली होती. काही महिला कर्मचाऱ्यांच्या तोंडावर मास्कचा पत्ता नव्हता. तर कार्यक्रमात सहभागी झालेल्यांनी सोशल डिस्टन्सिंगचे पालन केले नाही. महापालिका ५० पेक्षा जास्त लोकांना एकत्रित जमू देत नाही. लग्न, हळदी सभारंभ हे करू नयेत, असे आवाहन करते. इतकेच काय तर हळदीकुंकूच्या कार्यक्रमात गर्दी जमविल्याप्रकरणी महापालिकेने एका भाजप पदाधिकाऱ्यासह भाजपच्या माजी नगरसेवकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही केली होती. त्याचबरोबर डी मार्टने ग्राहकांची गर्दी जमविल्याप्रकरणी १० हजार रुपयांचा दंड आकारला होता. नागरिकांना नियम पाळण्याची सक्ती करणाऱ्या महापालिकेच्या अधिकारी वर्गाच्या निरोप सभारंभातच सोशल डिस्टन्सिंग पाळले गेले नाही. त्यामुळे हा कार्यक्रम चर्चेचा विषय ठरला आहे.
....
फोटो-कल्याण-फज्जा.
------------------