मुरबाड : तालुक्यातील वज्रेची वाडी येथे ऐन पावसाळ्यात पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली आहे. त्यामुळे आपली तहान भागविण्यासाठी गावकऱ्यांना सुमारे १ ते दीड कि.मी. अंतरावरील नदीच्या पात्राचा आधार घ्यावा लागतो आहे.मुरबाड शहरापासून १० ते १२ किमी अंतरावरील ४० ते ४५ घरांची वस्ती असलेले हे गाव. जवळ जवळ २०० ते २५० लोकांची वस्ती असूनही वज्रेची वाडी येथे भर पावसाळ्यात नागरिकांना पिण्याचे पाणी नसल्याने जंगलात दरी, डोंगर चढ-उतार करीत जावे लागते. एका नाल्यातून खड्डा (डवरा) खोदून पिण्याचे दूषित पाणी आणावे लागते आहे. या गावात २ किमी अंतरावर एकच विहीर आहे. मात्र, त्यातीलही पाणी दूषित आहे.उन्हाळ्यात दोन ते अडीच किमी काळू नदीवर पाणी आणण्यासाठी जावे लागते. पावसामुळे ठिकठिकाणचे रस्ते खचलेले तर काही ठिकाणी पाण्याची डबकी असतात. अशातच रस्त्यावर काही ठिकाणी शेवाळही साचलेले असते. अशा रस्त्यावरून चढ - उतार करत पडत - धडपडत फक्त पिण्याच्या पाण्यासाठी ही कसरत करावी लागते.सदर आदिवासी वाडीतील विहिरीचे पाणी कशामुळे दूषित झाले, त्याची सविस्तर पाहणी करण्यात येईल. या दूषित झालेल्या पाण्यामुळे वाडीत साथ उद्भवणार नाही, याची काळजी घेतली जाईल.- सचिन चौधर, तहसीलदार, मुरबाडआदिवासी वाडीत पाणीपुरवठा करणारी विहीर ही नदीच्या पात्रात आहे. नदीला आलेल्या पुरामुळे साठलेले पाणी दूषित झाले आहे. परंतु, ग्रामपंचायतीने घरोघरी मेडिक्लोरच्या बाटल्यांचे वाटप केले आहे.- मोहन घुडे, ग्रामसेवक, पिंपळगाव
वज्रेची वाडी येथील नागरिकांचे पावसाळ्यातही पाण्यासाठी हाल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2018 04:09 IST